आझाद मैदानात बेमुदत उपोषण

0

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून विविध कारणामुळे लांबणीवर पडलेला मुंबईतील मराठा क्रांती मोर्च्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंगळवार ३० मे रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील आझाद मैदान ते मंत्रालय असा मोर्चा निघणार आहे. त्यानंतर मराठा क्रांती मोर्च्याचे समर्थक आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसणार आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात येऊन घोषणा करणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुटणार नाही असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांनी जनशक्तीशी बोलताना सांगितले. तसेच यापूर्वी क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट २०१७ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र ही तारीखही बदलण्यात आली. त्यामुळे आता हा मोर्चा आज निघणार आहे.

कोपर्डी प्रकरणाचा निषेध करत औरंगाबादमधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा मोर्चे निघाले आणि प्रचंड प्रतिसादही मिळाला. त्यामुळे राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मात्र कधी नियोजनाचा अभाव, कधी मुंबई महापालिकेच्या निवडणूक ता कधी राजकीय दबाव अश्या विविध कारणांमुळे मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा रखडला होता. मात्र मंगळवारी हा मोर्चा निघणार आहे.

मुंबईतील मराठा मोर्च्यासाठी राज्यभरातून मराठा समाज सहभागी होणार आहे. दुपारी १२ वाजता मराठा समाजाचे आझाद मैदान येथे जमणार आहे. त्याठिकाणी श्रद्धांजली आणि भाषण होणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता आझाद मैदान ते मंत्रालय अशी धडक दिली जाणार आहे. त्यानंतर आझाद मैदानात बेमुदत उपोषण छेडण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्च्याचे कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार नाहीत. कोणताही निर्णय त्यांना जाहीर करायचा असेल तर त्यांनी आझाद मैदानात येऊन मराठा समाजासमोर जाहीर करावा असा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाला कोणताच अडथळा नसून, पोलीस परवानगी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. यंदाच्या शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा करावी, शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा अश्या विविध मागण्या असल्याचे हि पाटील यांनी सांगितले.