आठवडेभरात मान्सुन अंदमानमध्ये धडकणार : महाराष्ट्राबाबत जाणून घ्या नेमकी बातमी

जळगाव : उकाड्याने हैराण झालेल्या नागरीरकांना लवकरच दिलासा मिळणार असून यंदाच्या मान्सूनबाबत दिलासा देणारी बातमी आहे. यंदा मान्सूनचे आगमन हे वेळेपूर्वीच होणार असून आठवड्याभरात आंदमानमध्ये मान्सून धडकणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे तर तळकोकणात देखील 27 मे ते 2 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुढील चार आठवड्याचे अंदाज वर्तवले आहेत.

अनेक भागात उष्णतेचा कहर
दरवर्षी शेतकर्‍यांसह सर्वसामान्य मान्सूनची वाट पाहत असतो. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रासह अनेक भागात उष्णतेने कहर केला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक चांगेलच हैराण झाले आहे. त्यातून आता लवकर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस 22 मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावणार आहे. तर केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

वेळेपूर्वीच होणार मान्सुनचे आगमन
भारतीय हवामान विभागाने 4 आठवडे कसे राहतील याबाबत अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मान्सूनचे आगमन तर वेळेपूर्वीच होणार हे स्पष्ट झालं आहे पण राज्यात केव्हा मान्सून दाखल होणार याची माहिती ही 15 मे रोजी दिली जाणार आहे. तळकोकणात आणि मुंबईच्या काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

खरीप हंगामासाठी पोषक वातावरण
सध्या शेतकर्‍यांना खरीपाची लगबग लागली असून शेतजमिनी मशागतीची कामे सुरू आहेत. वेळेत पाऊस झाला तर उत्पादनात वाढ होणार आहे. शिवाय परतीच्या पावसाचा धोका राहणार नाही. गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी तत्पर झाला असून पावसाने जर साथ दिली तर उत्पादनात वाढ होणार आहे.