वडगाव-मावळ : येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. हा बाजार वडगाव रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या तलावाजवळ भरतो. आठवडे बाजार झाल्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत बाजाराच्या ठिकाणी झालेला कचरा उचलण्यात येतो. मात्र, मागच्या गुरुवारी आठवडे बाजार भरल्यानंतर झालेला कचरा तब्बल चार दिवस लोटले तरी, अद्यापपर्यंत उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक व जवळपास असणार्या सरकारी कार्यालयांमध्ये येणार्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वडगाव तालुक्याचे प्रमुख केंद्र
वडगाव हे मावळ भागाचे तालुक्याचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. मावळ तालुक्याची सर्व सरकारी कार्यालये वडगाव येथे आहेत. तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, दस्त नोंदणी कार्यालय येथे असल्याकारणाने वडगावात रोजच लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आठवडे बाजारामुळे निर्माण झालेला कचरा न उचलल्यामुळे बाजार परिसरात घाण पसरली आहे. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे साचलेला कचरा सडला असून, त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. यातून ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
एकीकडे ‘स्वच्छ भारत अभियाना’चा सर्वत्र मोठा गाजावाजा केला जात आहे. देशभरात स्वच्छतेचे आवाहन करणार्या भाजपची वडगाव ग्रामपंचायतीत सत्ता आहे. ग्रामपंचातीच्या माध्यमातून येथे स्वच्छतेचे उपक्रमदेखील राबविण्यात येतात. परंतु, हा प्रकार समोर आल्यानंतर स्वच्छतेचे कार्यक्रम केवळ नावापुरतेच राबविण्यात येतात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कचर्याची दुर्गंधी वाढत असून, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडे बाजार संपल्यानंतर परिसरात पडलेले फळे, भाज्या आणि इतर कचरा ग्रामपंचायतीने तत्काळ साफ करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.