तब्बल दोन महिन्यानंतर जळगाव जिल्हा अनलॉक

जळगाव – जळगाव जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर हा पाच टक्क्यांपेक्षा कमी व ऑक्सीजन बेड्सची व्यापकता असल्याने शासनाने जाहीर केलेल्या निकषानुसार जळगाव जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा हा पुर्णत: अनलॉक करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे. सर्व व्यवहार सुरू होणार असले तरी संख्या आणि वेळेचे निर्बंध मात्र कायम ठेवण्यात आले आहे. तब्बल दोन महिन्यानंतर जळगाव जिल्हा अनलॉक होत असल्याने जिल्हावासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
राज्य शासनाकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू करतांना पाच टप्पे करण्यात आले आहे. पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सीजन बेड्सची उपलब्धता या निकषांवर हे टप्पे ठरविण्यात आले आहे. तसेच अनलॉकच्या प्रक्रियेचे अधिकार हे स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे सोपविण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचा दि. ३ जून पर्यंतचा पॉझिटीव्हीटी दर हा १.२७ टक्के असून ऑक्सीजन बेड्सची व्यापकता ही १७.६५ टक्के आहे. राज्याच्या निकषानुसार जळगाव जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दि. ७ जूनपासून ते पुढील आदेश होईपर्यंत संख्या आणि वेळेचे निर्बंध कायम ठेवत जिल्हा अनलॉक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.
असे होईल अनलॉक
अत्यावश्यक सेवा आणि इतर सर्व प्रकारचे दुकाने आस्थापने हे रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच दुकानात दर्शनी भागात पारदर्शक शीट लावणे, पाच ग्राहकांना प्रवेश देण्याचे बंधन कायम राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, सायकलींग, मॉर्निंग वॉक, सर्व प्रकारच्या बैठका, ग्रामपंचायत, सोसायटी निवडणूक, सर्व प्रकारचे बांधकामे, कृषि संबंधित कामे, खाजगी कार्यालये, शासकीय कार्यालये (१०० टक्के उपस्थिती), ई-कॉमर्स सुविधा, सार्वजनिक वाहतूक व माल वाहतूक व्यवस्था, सर्व कंपन्या, औद्योगिक आस्थापना, सर्व निर्मीती करणारे घटक, सर्व निर्यात करणारे घटक व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणी वावरणे सुरू राहणार आहे. आंतर-जिल्हा प्रवास देखिल नियमीतपणे सुरू ठेवण्याला परवानगी असून टप्पा-५ मध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यामध्ये प्रवास करण्यासाठी मात्र ई-पास घेणे आवश्यक राहील.
संख्या आणि वेळेचे बंधन असलेले व्यवहार
शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स ५० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरू राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार यांनाही ५० टक्के ग्राहकांसह स. ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील. क्रीडा प्रकार, स्पर्धा ५० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरू राहतील. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी २ तासांची मुभा आणि १०० लोकांची उपस्थितीचे बंधन कायम राहणार आहे. लग्न समारंभ, अंत्यविधीसाठी ५० लोकांच्या उपस्थितीचे बंधन कायम ठेवण्यात आले आहे. जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर, वेलनेस सेंटर ५० टक्के ग्राहक क्षमतेसह सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे.
पॉझिटीव्हीटी दर वाढल्यास पुन्हा निर्बंध लागणार
जळगाव जिल्हा सोमवारपासून अनलॉक होणार असला तरी नागरिकांना चेहर्‍यावर मास्क बंधनकारक असून सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सींगचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. तसेच भविष्यात जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ५ टक्केपेक्षा अधिक आणि ऑक्सीजन बेड्सची व्यापकता २५ टक्केपेक्षा अधिक झाल्यास आदेशात नव्याने सुधारणा होऊन निर्बंध लागण्याची शक्यताही प्रशासनाने वर्तविली आहे