मुंबई | ‘वंदे मातरम्’बाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश आल्यानंतरही भाजपाच्या पाठींब्यावर केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळविलेल्या रामदास आठवले यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात समाजवादी पार्टीच्या अबू आझमी व वारिस पठाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधी सूर आवळला. एखाद्याने वंदे मातरम् म्हटले नाही, तर काय बिघणार आहे? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या 11व्या वर्धापन दिनी स. है. जोंधळे सभागृहात आयोजित कार्यक्रमात आठवलेंनी ही मुक्ताफळे उधळली. यापूर्वी भाजपच्याच केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी व स्वामी अग्निवेश यांनीही ‘वंदे मातरम्’ला विरोध दर्शविला आहे.
नेमके काय म्हटले आठवले?
सध्या राज्यात वंदे मातरम् म्हणण्यावरून जो वाद सुरू आहे, तो केवळ दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक काढला जात आहे. एखाद्याने वंदे मातरम् म्हटले नाही, तर काय बिघणार आहे? देशात बहुसंख्य समाज गुण्यागोविंदाने राहत आहे. काही खेड्यांत दलित-सवर्णांमध्ये अपवादात्मक वाद दिसून येत होते. तोही वाद आता संपुष्टात आला आहे.
माझी सोबत असेपर्यंत मोदींना भीती नाही
‘जोपर्यंत मी मोदींच्या सोबत आहे, वा मोदी माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत मोदींना भीती नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती व भिमशक्ती एकत्र आणण्याची सूचना केली होती. प्रबोधनकार ठाकरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक आंदोलनात एकत्र होते. त्यामुळेच शिवशक्ती व भिमशक्ती एकत्र झाली.
गोहत्या बंदीही समाजात तेढीसाठी
गोहत्या बंदीला रिपब्लिकन पक्षाने विरोध केला होता. मात्र समाजात तेढ निर्माण करण्यासाठी गोहत्या बंदीचा प्रश्न निर्माण केला जात असल्याचा आरोप आठवलेंनी यावेळी केला. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, पत्रकार अनंत पाटील, आमदार नरेंद्र पवार, भाजपा नेते शिवाजीराव आव्हाड, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर आदी उपस्थित होते.