आठवले, बापट यांच्या हस्ते ‘आयुष्मान जनआरोग्य योजने’च्या ई-कार्डचे वाटप

0

पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत

पुणे : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण 4 लाख 57 हजार 28 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री आठवले आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते निवडक लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन बिलोलीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, डॉ. अमोल म्हस्के उपस्थित होते.

971 प्रकारचे उपचार; दीड लाखांपर्यंत सुविधा

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नांदापूरकर यांनी सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्‍चात सेवा देण्यात येत असल्याचे सांगितले. प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यात आयुष्मान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करून घेतले जाणार आहे. प्रारंभी धन्वंतरीचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केले.

..त्यांचे नाव गिरीश बापट

जिल्हाधिकारी राम यांनी मराठीतून प्रास्ताविक केल्यानंतर आठवले यांनी त्यांचे कौतुक केले. बिहारमधील असूनही मराठी चांगले बोललात अशा शब्दांत त्यांचे अभिनंदन केले. आठवले यांनी काव्यातून भावना व्यक्त केल्या. बापटांविषयी ते म्हणाले, ‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट’.

महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविणार

आठवले म्हणाले, औषध आणि पैशांअभावी एखाद्याचा मृत्यू होऊ नये, यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेमुळे राज्यातील 83 लाख 72 हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. आयुष्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे एक मिशन आहे

बापट यांनी गरीब आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शासनाच्या योजना असल्याचे सांगून गरीबांपर्यंत या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन केले. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकदिलाने काम करावे, हे एक मिशन आहे, असे समजून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. गरीब माणसाची सेवा केली तर त्यासारखा आनंद व सुख कशातही नाही, असेही ते म्हणाले