आठवा दिवसही आटला गोंधळातच !

0

मुंबई:- विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी वाया गेल्यानंतर आज, गुरुवारी आठव्या दिवशीही मोठ्या प्रमानावर गोंधळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सुरुवातीपासूनच शेतकरी कर्जमाफीचा गोंधळ सुरु असल्याने कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तब्बल 5 वेळेस स्थगित करून शेवटी दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सर्वपक्षीय सदस्य कर्जमाफीच्या मुद्दयावर आक्रमक पद्धतीने अडून बसल्याने गोंधळात काही विधेयके करण्याचे तुरळक कामकाज वगळता काहीही कामकाज होऊ शकले नाही.

11 वाजता सभागृहाची बैठक सुरु झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराची घोषणा केली. यानंतर विरोधकांनी आणि शिवसेना तसेच भाजपच्या सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी सुरु केली. अध्यक्षांनी अवघ्या 2 मिनिटांत कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केले. यानंतर 11.30 वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटात पुन्हा अर्ध्यातासासाठी कामकाज तहकूब केले. 12 वाजता मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांनी आपले निवेदन सादर केले. निवेदन सादर करताना देखील घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले होते. निवेदन संपताच मुख्यमंत्री सभागृहाबाहेर गेले. यानंतर शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा जोर वाढत चालल्याने आणि सदस्य अधिक आक्रमक झाल्याने शेवटी 12.38 वाजता सभागृह संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सेनेचे तळ्यात मळ्यात
सभागृहात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडक वर पाय, मोदी सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय, कृषिमंत्री हाय हाय, शेतकरी कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारची घोषणाबाजी सभागृहात केली गेली. यावेळी सेनेच्या सदस्यांचे अगदीच तळ्यात मळ्यात सुरु होते.मुख्यमंत्री येण्याआधी आक्रमक असलेली सेना मुख्यमंत्र्यांचे निवेदन ऐकल्यानंतर शांत झालेली दिसून आली. यावेळी भूमिका मांडताना देखील शिवसेना सदस्य गोंधळले असल्याचे चित्र होते. शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम असून अर्थसंकल्प सादर करण्याआधी ठोस निर्णय घ्यावा असे सेनेच्या वतीने सांगण्यात आले. एकंदरीतच भूमिका मांडताना देखील सेनेच्या आमदारांमध्ये गोंधळ झाल्याचेच चित्र होते.