आठवीतील मुलीवर सामूहिक बलात्कार

0

नराधमांनी तिला जीवंत जाळले, 16 जणांना अटक

रांची : गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटनांनी देश हादरलेला असतानाच क्रौर्याची परिसीमा गाठणारा सामूहिक बलात्काराचा प्रकार घडला आहे. झारखंड येथील चतरा या जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीसोबत काय झाले आहे हे समजताच गावातील पंचांनी या घटनेतील दोषींना प्रत्येकी 100 जोरबैठका आणि 50 हजारांचा दंड ठोठावला. दंड ठोठावल्याचा राग मनात धरून हे नराधम पीडित मुलीच्या घरी गेले. तिथे तिच्या घरात बळजबरीने घुसले आणि तिला घरातच जाळून ठार मारले. या गुन्ह्यातील 16 आरोपींना पोलिसांनी शनिवारी अटक केल असून, यामध्ये मुख्य सूत्रधाराचाही समावेश आहे.

गाव पंचांवरही कारवाई
याप्रकरणी 20 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप 4 नराधम फरार आहेत. या गुन्ह्याचा तपास विशेष पथक करत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले. जेथे घटना घडली तो भाग नक्षलग्रस्त आहे. पीडित मुलीच्या एका नातेवाईकाने सांगितले की, गुरूवारी रात्री विवाहाच्या निमित्ताने सर्वजण बाहेर गेले असताना दारू पिऊन आलेल्या चौघांनी मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी गाव पंचांवरही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अडिच लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे.

घरात घुसून जीवंत जाळले
पीडित मुलगी आठवीत शिकत होती अशी माहिती पोलिसांनी दिली. छतरा या ठिकाणच्या राजा केंदुआ गावात ही घटना घडली. मात्र या सगळ्या घटनेनंतर जो दंड ठोठावण्यात आला त्याचा राग मनात ठेवून या नराधमांनी या मुलीच्या घरात घुसून तिला जीवंत जाळले. तसेच तिच्या आईवडिलांनाही मारहाण केली. घरातील सर्वजण लग्नासाठी बाहेर गेले असताना नराधमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रात्री 11 च्या सुमारास ही मुलगी रडत घरी आली आणि तिने आपल्या आई वडिलांना सगळा प्रकार सांगितला.