आठ कोटींची विकासकामे मंजूर

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकासकामे करण्यासाठी येणार्‍या सुमारे आठ कोटी आठ लाख 43 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून ताब्यात आलेले नाल्यांचे सुशोभिकरण, देखभाल व संरक्षण करण्यासाठी येणार्‍या एक कोटी 29 लाख रुपयांच्या खर्चासह सेक्टर क्रमांक 23, निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे यांत्रिक व तांत्रिक विषयक देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी येणार्‍या 53 लाख 67 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली.

या कामांसाठी निधी मंजूर
दापोडी साठवण टाकी ते आंबेडकर पुतळा मुख्य 400 मिलीमीटर व्यासाची वितरण वाहिनी टाकण्यासाठी येणार्‍या 41 लाख 91 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच, सेक्टर 23, निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत टप्पा क्रमांक तीन येथील बॅकवॉशच्या टाकीला गळती थांबवण्यासाठी सुरक्षा आवरण करून घेणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी 33 लाख 26 हजार, जलशुद्धीकरण केंद्र आवारातील रस्त्यांचे डांबरीकरण व सुशोभिकरण करण्यासाठी 59 लाख 12 हजार, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी पिंपरी ते दापोडी दरम्यान अडथळा करणारे स्ट्रीट लाईटचे खांब हलविण्यासाठी तीन कोटी 15 लाख, सांगवी गावठाण, सांगवी पीडब्ल्युडी, सांगवी सर्व्हे नंबर 84, पिंपळेगुरव व दापोडी येथील पंप हाऊसचे चालन करण्यासाठी 50 लाख 49 हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली.

पिंपळे गुरवच्या प्रेक्षागृहात ध्वनिक्षेपक यंत्रणा
महापालिकेच्या लांडेवाडी, बोपखेल, सर्व्हे नंबर 96 व रहाटणी येथील शुद्ध पाणीपुरवठा करणार्‍या पंप हाऊसचे चालन करण्यासाठी 33 लाख 58 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच, पिंपळे गुरव येथे बांधण्यात येणार्‍या प्रेक्षागृहात अत्याधुनिक पद्धतीची ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यासाठी 85 लाख 99 हजार रुपयांचा खर्च मंजूर झाला.