आठ तरुणांना 20 लाखांचा गंडा

0

पुणे । मेट्रोमोनीअल साईटवर नाव नोंदविलेल्या तरुणांशी संपर्क साधून त्यांच्याशी ऑनलाईन जवळीक वाढवत विश्‍वास संपादन करून रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक करणार्‍या नागपूर येथील जोडप्यास सायबर क्राईम सेल पुणे शहरने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी सात ते आठ तरुणांना 20 लाखांना गंडा घातल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. किशोर चुडामन रामटेककर (वय 34) आणि रिंकी उर्फ कामिनी किशोर रामटेककर (वय 28) अशी अटक पती-पत्नीची नावे आहेत.

सिंहगड रोड परिसरातील संगणक अभियंता असलेल्या 31 वर्षीय घटस्फोटीत तरुणाने पुनर्विवाहासाठी ब्राम्हण, देशस्थ डायव्होसी मॅट्रोमोनीवर नाव नोंदवले होते. त्यानुसार पल्लवी असलकर नावाच्या एका मुलीने त्याला संपर्क साधला. झारखंडमधील रायगढ येथे पीडब्लूडी नोकरीस असल्याचे सांगितले. रोज दोघांचे फोन आणि व्हॉट्सअपवर संभाषण सुरू झाले. काही दिवसांनी पल्लवीने वडिलांना हार्टअटॅक आला असून त्याच्याकडून 2 लाख 15 हजार रुपये उकळले दरम्यान काही दिवसांनी वडिलांचे निधन झाल्याचे सांगत फिर्यादीचा फोन उचलणे बंद केले. मुलाला संशय आल्याने त्याने रायगढ येथे जाऊन चौकशी केली असता सदर नावाची व्यक्ती तेथे नसल्याचे समजले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सिंहगड रोड पोलिसांत याची तक्रार दिली. सांगवी येथील तरुणानेही शादी डॉट कॉम या वेबसाईटवर लग्नासाठी नाव नोंदविले होते. त्यालाही काव्या असलकर नावाच्या मुलीने 2 लाख रुपये घेऊन फसवले. याप्रकरणी त्याने सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.

मोबाईल क्रमांकावरून लावला छडा
सायबर क्राईम सेलने गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपास केला असता नागपूर येथून गुन्हा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली. रिंकी उर्फ कामिनी किशोर रामटेककर हिने काव्या आणि पल्लवी असलकर नावाने मेट्रोमोनीअल साईटवर नाव नोंदवून ठेवले होते. त्याद्वारे विवाहेच्छुक तरुणांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करत असल्याचे आरोपींनी कबूल केले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 4 मोबाईल, युनियन बँकेचे पासबूक, एटीए कार्ड, फेक आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, डेबीट कार्ड, पेनड्राइव्ह आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.