मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकलच मुंबईकरांचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरू लागली आहे. गेल्या आठवड्या भरात मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील विविध अपघातात ५६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले असून तब्बल ७६ प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी एका दिवसात तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले. यापैकी अनेकांची ओळख पटलेली नाही.
रेल्वेने दिवसभरात ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वेने सुरक्षित प्रवास करावा, अपघात टाळावा यासाठी सतत रेल्वेकडून जनजागृती करण्यात येते. तरी लोकलमधून विविध अपघातात मृत्य व जखमी होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोकलमधून पडणे, खांबांना धडकणे, लोकल आणि फलाटाच्या फटीत पडणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे, रुळांवर आत्महत्या करणे इत्यादी कारणे अपघातांच्या मागे आहेत. रेल्वे रूळ ओलांडताना सर्वांत जास्त अपघात झाल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
सीएसटीएम ५, दादर १, कुर्ला ८, ठाणे २, डोंबिवली १, कल्याण ६, कर्जत २, वडाळा ७, वाशी २, पनवेल ०, चर्चगेट १, मुंबई सेंट्रल १, वांद्रे ३, अंधेरी ०, बोरीवली १०, वसई रोड ४, पालघर ३ असे एकूण ५६ प्रवासी मृत झाले आहेत. तर सीएसटीएम ७, दादर १, कुर्ला ४, ठाणे ४, डोंबिवली ३, कल्याण ११, कर्जत १, वडाळा ५ , वाशी २, पनवेल ०, चर्चगेट ३, मुंबई सेंट्रल ११, वांद्रे ०, अंधेरी ७, बोरीवली ८, वसई रोड ४, पालघर ५ असे एकूण ७६ प्रवासी जखमी झाले आहेत.