आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा! 

0
नागरिकांचे प्रश्‍न सत्ताधारी नगरसेवकांच्या डोळ्यात आले अश्रू
महापौरांचा अधिकार्‍यांना निर्वाणीचा इशारा
पिंपरी : शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले असूनही शहरातील सर्वच भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. प्रभागातील नागरिक दररोज कार्यालयात येऊन तक्रारी करत आहेत. पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी स्थिती झाल्याने नागरिकांना उत्तरे देताना नगरसेवकांना नाकी नऊ येत आहे. नागरिकांचे प्रश्‍न सोडवू शकत नसल्याने पाणीपुरवठ्याच्या भर बैठकीतच सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना अश्रू अनावर झाले. त्यावर महापौर राहुल जाधव यांनी, येत्या आठ दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्वाणीचा इशारा अधिकार्‍यांना दिला. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वच भागात गेल्या काही दिवसांपासून अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील आयुक्त दालनात आज (शनिवारी) पदाधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
आठ दिवसात पाणी पुरवठा
शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले असूनही पाण्याची समस्या उग्र आहे. शहरातील सर्वच भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील नागरीक त्रस्त झाले आहेत. गणपती उत्सवात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. तर पुढील महिन्यात नवरात्र, त्यानंतर दिवाळीचा सण आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी महापौरांनी येत्या आठ दिवसांत पाणी पुरवठा उच्च दाबाने व सुरळित करण्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकर्‍यांना आदेश दिले. नागरिकांना भेडसावणार्‍या अनेक प्रश्‍नांना नगरसेवकांना उत्तरे द्यावी लागतात. पाणी साठा मुबलक असूनही विस्कळीत आणि कमी दाबाने पाणी मिळते आहे. नागरिकांना पाण्यासाठी इकडे तिकडे फिरावे लागते, ही गोष्ट मुळात चुकीची गोष्ट आहे, असेही नगरसेवकांनी सांगितले.
पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक आम्हाला विचारणा करतात. त्यांना उत्तरे देता-देता नाकी नऊ येत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करताना सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे, शत्रुघ्न काटे यांना बैठकीतच अश्रू अनावर झाले. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर चक्राकार पध्दतीने शहरातील एका भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवून दररोज 60 एमएलडी पाणी वाचण्याचे देखील महापालिकेचे नियोजन असल्याचे महापौरांनी सांगितले. तर, शहरात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामे वाढत असल्यामुळे मंजुर असलेला 470 एमएलडी पाणीसाठाही शहराला कमी पडत असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.