पणजी । आय लीगमधील संघानी आपल्या मागण्यांचे एक निवेदन अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला दिले आहे. आय लीगमधील सामने आठवड्याच्या शेवटी खेळवण्याबरोबर संघात आठ परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची मागणी या निवेदनाद्वारे आय लीगमधील संघानी केली आहे. सद्यःस्थितीत तीन गैर आशियाई आणि एक आशियाई फुटबॉलपटू खेळवण्याची परवानगी आयलीगमध्ये आहे. पण आता संघानी विशेषत: मोहन बगान आणि इस्ट बंगाल या बड्या संघानी या मागणीसाठी जोर लावला आहे. यासंदर्भात भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव कुशल दास म्हणाले की, आय लीगच्या संघाव्यवस्थापनाच्या बैठकीत संघटनेचा कोणी पदाधिकारी सहभागी झाला नव्हता. त्यांनी चर्चा करून आठ परदेशी खेळाडू आणि त्यातील पाच जणांना सामन्यात खेळू देण्याचा मुद्दा संघटनेपुढे ठेवला आहे. त्यांच्या या मागण्या आयलीगच्या संयजन समितीपुढे ठेवू. आठ परदेशी खेळाडूंपैकी दोन खेळाडू आशियाई असतील, अशी सुधारणाही आय लीग संघानी सुचवली आहे.
संघामध्ये एकमत नाही
या मागण्यांसदर्भात आयलीग संघामध्ये एक मत झालेले नाही. ऐझावल फुटबॉल क्लब, चेन्नई सिटी फुटबॉल क्लब, मिनर्वा पंजाब फुटबॉल क्लब आणि नेरोका फुटबॉल क्लब यांनी जादा परदेशी खेळाडूंच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. मिनर्वा संघाचे मालक रणजित बजाज यांनी, चार संघांना वेगळे काही तरी पाहिजे, ही फॉरेन प्रीमिअर लीग व्हावी, असे काही लोकांना वाटते.
आयएसएलमधून परदेशी खेळाडू कमी केले
एकीकडे आयलीगमध्ये परदेशी खेळाडू वाढवण्याची मागणी होत असताना आयएसएलमधील परदेशी खेळाडूंची संख्या मात्र कमी करण्यात आली आहे. आयएसएलच्या पहिल्या सत्रात 11 परदेशी खेळाडूंना संघात घेण्याची मुभा देण्यात आली होती. आता ही संख्या आठवर आणण्यात आली असून त्यातील पाच जणांची खेळणार्या 11 खेळाडूंमध्ये निवड करण्याची परवानगी दिली होती.