भाजपनेते एकनाथ खडसे यांचा सूचक सवाल
पुणे : माझ्या राजकीय कारकिर्दीत मी आजवर 8 मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्यांच्याकाळात माझ्याविरोधात कधी काही घडले नाही. मात्र, आत्ताच एक वर्षापासून काय मागे लागले आहे. या सर्व आरोपांतून मी निर्दोष बाहेर आलो असून, अजून किती आरोप माझ्यावर होत आहेत याचीच वाट पाहतोय. त्यामुळे कोणाला किती ओरडायचेय ते ओरडू द्या. मी प्रमाणिकपणे काम करीत आहे आणि यापुढेही करीत राहणार आहे, असे सुचक वक्तव्य माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुणे येथे केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा खडसे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मुंडेंच्या आठवणीने खडसे गहिवरले
जीवनगौरव पुरस्काराला उत्तर देताना खडसे म्हणाले, भाजपची काही काळापूर्वी ब्राह्मण समाजाचा पक्ष अशी ओळख होती. मात्र, आता सर्वसमावेशक पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे असते तर राज्यातील राजकारणाची दिशा आज वेगळी असती. मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरु झाली असून, ती अशीच कायम राहणार असल्याचे ते म्हणाले. गोपीनाथ मुंडेंची आठवण काढताना खडसे यांना गहिवरुन आले होते.
चांगल्या व्यक्तींनी राजकारणात यावे
सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना ते म्हणाले, राजकारणात जोवर चांगल्या व्यक्ती येत नाहीत तोवर इथली परिस्थिती बदलणार नाही. परिस्थितीतील स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. निर्वासितांबाबत बोलताना खडसे म्हणाले, भारतात सध्या कोणीही परदेशी व्यक्ती येऊन राहते. धर्मशाळा असल्यासारखे हे झाले आहे. त्यामुळे त्यांना नागरिकत्व देण्यात येऊ नये. भारतीय सीमांवर अशा लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदी आणावी, अशी मागणी आपण यापूर्वी केली आहे.
राजकीय घडामोडींचे संकेत?
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडसे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. खडसे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार मिळणे म्हणजे करिअर संपले असे नाही तर ती कामाची पोचपावती आहे. मात्र, काहींना असे वाटत असले तरी आता खर्याअर्थाने माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आहे. आता शुन्यातून विश्व निर्माण करेन, असे सूचक विधान खडसे यांनी केले. त्यांचे हे विधान म्हणजे आगामी काळात महाराष्ट्रात काही राजकीय घडोमोडी घडणार असल्याचे संकेत आहेत, असे मानले जाते. ते म्हणाले, जेव्हा माणूस करिअरच्या अत्युच्च बिंदूवर असतो तेव्हा त्याला हा पुरस्कार देण्यात येतो. शिवाय मी पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदार्या समर्थपणे पार पाडत असल्याने माझे करिअर अद्याप संपलेले नाही. उलट माझ्या करिअरला आता कुठे सुरुवात झाली आहे, असे मी मानतो. पेट्रोल-डिझेल दरवाढीवर सरकारची भूमिका काय? या प्रश्नावर बोलताना खडसे म्हणाले, सध्या जे कर आहेत त्यात भाजप सरकारने कोणताही नवा कर लादला नसून, आधीच्या सरकारनेच लावलेले हे कर आहेत.