मनोर । महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील 89 लाख शेतकर्यांचे 34 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. परंतु, कर्जमाफीचे काम अतिशय संंथ गतीनेे चालू असूूून शेतकर्यांना आजही कर्जमाफीची वाट पाहावी लागत आहे. शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर लाल, हिरवी आणि पिवळ्या रंगाच्या याद्या येत असून त्याचा ताळमेळ व्हावा म्हणून सध्या टीएलसी समितीच्याद्वारे मिसमॅच याद्यांचे काम युद्धपातळीवर चालू आहे. या कर्जमाफी योजनेचा आढावा घेतल्यानंतर कर्जमाफीच्या रक्कमेमध्ये आणि लाभार्थी शेतकर्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे निर्दशनास आले आहे. राज्यातील जवळपास आठ लाख शेतकरी हे या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत.
31 लाख शेतकर्यांना कर्जमाफी दिल्याचा दावा
कारण या शेतकर्यांना स्वतःकडे असलेली दीड लाखाच्या वरील रक्कम भरणा केली, तरच दीड लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली असली तरी राज्यात जवळपास 8 लाख 20 हजार शेतकरी असे आहेत की, त्यांचे कर्ज दीड लाखापेक्षा जास्त आहे. दीड लाख रुपये पेक्षा जास्त असलेली रक्कम शेतकर्यांना 31 मार्चपर्यंत बँकेत अथवा संस्थेकडे भरणा करावयाची आहे, तरच त्या शेतकर्यांना दीड लाख रुपये माफ होणार आहेत. या आठ लाख वीस हजार शेतकर्यांचे 8 हजार कोटी रुपये शासनाकडून बँकेत जमा करण्यात आले आहेत. मात्र, शेतकर्यांनी वरील रक्कम भरणा केल्यावरच हे 8 हजार कोटी रुपये शेतकर्यांना त्यांच्या कर्जापोटी प्रत्यक्षात मिळणार आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने 31 लाख 32 हजार शेतकरी खातेदारांना 12 हजार 362 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.