आठ वर्षांच्या सावत्र भावाचा रागाच्या भरात केला खून

0

लोहगाव परिसरातील घटना

पुणे । रागाच्या भरात अचानक जवळ बसलेल्या आठ वर्षीय सावत्र भावाच्या डोक्यात घातक शस्त्राने वार करून खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. लोहगाव परिसरात एअर फोर्स ऑफिसर मॅरिड क्वार्टरमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

रघुनाथ पांडुरंग वरळे (८, रा. लोहगाव, मूळ, नांदेड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सावत्र भाऊ ज्ञानेश्वर वरळे (३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वडील पांडुरंग वरळे (७८) यांनी फिर्याद दिली आहे.
पांडुरंग वरळे यांच्या दहा वर्षांपूर्वी दुसरा विवाह झाला असून, दुसर्‍या पत्नीचा मयत रघुनाथ वरळे हा मुलगा आहे. तर आरोपी ज्ञानेश्वर हा पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्‍वर याने रागाच्या भरात मयत रघुनाथ याच्या डोक्यात वाकस या शस्त्राने गंभीर वार केला. आवाज आल्याने फिर्यादी पांडुरंग हे पळत आले. त्यांनी तात्काळ रघुनाथला घेऊन रुग्णालय गाठले. तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. विमानतळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याघटनेत रघुनाथ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सायंकाळी उपचारादरम्यान रघुनाथ याचा मृत्यू झाला.