पुणे । पुणे-मुंबई वाहतूक लक्षात घेता या मार्गावर अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित व्हावी, हायपरलूप या नवीन प्रकाराच्या वाहतुकीचा वापर प्रस्तावित आहे. ‘हायपर लूप’ कंपनीने याबाबतचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दिला असून, तो 15 जानेवारीला राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. या प्रकल्पास त्वरित मान्यता मिळाल्यास अवघ्या आठ वर्षांत म्हणजे 2026मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचे प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट शासन आणि लॉस एंजेलिसमधील ‘हायपरलूप’ यांच्यात नोव्हेंबर 2017मध्ये पुणे-मुंबई हायपरलूपबाबत सामंजस्य करार झाला आहे. पीएमआरडीएच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याबाबतच्या करारावर स्वाक्षर्या केल्या होत्या. या करारानुसार पुणे-मुंबई विभागातील मार्गांचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करून हायपरलूप आधारित प्रवासी ट्रॅफिक सिस्टिम कार्यान्वित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पीएमआरडीए आणि हायपरलूप कंपनी संयुक्तरीत्या हा अभ्यास अहवाल तयार केला आहे. यासाठी पीएमआरडीए व हायपरलूपने प्रवासी वाहतूक आणि अभ्यास इतर संबंधित डेटा प्राप्त करण्यासाठी पीएमआरडीए राज्य शासनाच्या तसेच महापालिकांच्या सर्व विभागांशी समन्वय साधला आहे.
प्रवास वेळ 20 मिनिटांपेक्षा कमी होणार
जलद सार्वजनिक वाहतुकीचे व्यवहार्य साधन बनण्यासाठी उच्च घनतेची वाहतूक आवश्यक असून, हायपरलूप यंत्रणा द्रुतगतीच्या वाहतूक यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहे. या तत्रज्ञानामुळे तंत्रज्ञानाने मुंबई आणि पुणे विभागांतील महानगर प्रदेशांना जोडल्यास प्रवास वेळ 20 मिनिटांपेक्षा कमी होणार आहे.
अहवाल राज्य शासनास सादर करणार
अहवालामध्ये हायपरलूपने पुणे ते नवी मुंबई, पुणे ते वाशी आणि पुणे ते सांताक्रुझ असे तीन मार्ग सुचविले आहेत. हा अहवाल राज्य शासनास सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील ती समिती याचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर आवश्यक ते बदल करून या प्रकल्पास मान्यता मिळणार असल्याचेही गित्ते यांनी सांगितले.