आठ वर्षीय मुलीचा विनयभंग ; तरुणाला 1 वर्ष 11 दिवस कारावास

0

पाचोरा तालुक्यातील घटना ः 15 हजार रुपये दंडाची शिक्षा

जळगाव: घरातील रॅकमधील डब्यावरील दगड काढावयाचा आहे, या बहाण्याने घरात बोलावून आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग करणार्‍या संशयित दिपक अशोक पाटील वय 19 रा. टाकळी बुद्रुक ता. पाचोरा यास न्यायालयाने 1 वर्ष 11 दिवस साधा कारावास तसेच 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्या. पी.वाय.लाडेकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

आठ वर्षीय बालिका तिच्या घरासमोर बदाम वेचत होती. यादरम्यान दिपक पाटील याने बालिकेला त्याच्या घरात असलेले रॅकमधील डब्यावरचा दगड काढावयाचे आहे, असे सांगून घरी बोलावले. बालिका घरात गेली असता, दिपक पाटील याने तिच्यासोबत गैरकृत्य केले. याप्रकरणी 23 ऑगस्ट 2018 रोजी पिडीत बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरुन दिपक पाटील विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरिक्षक पंकज शिंदे यांनी तपासअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

दंडाच्या रकमेतून फिर्यादीला नुकसान भरपाई

अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांन्या न्यायालयात हा खटला चालला. खटल्यात सरकारपक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत बालिकेची आई, पिडीतेचे काका, वैद्यकीय अधिकारी, पं.स. एरंडाले येथील गटविकास अधिकारी, तपासअधिकारी, यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षी व पुराव्यानुसार न्या. लाडेकर यांनी संशयित दिपक पाटील यास भादंवि 354 या कलमाखाली दोषी धरुन एक वर्ष व 11 दिवस साधा कारावास तसेच 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्यार रक्कम नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचे आदेशही दिले. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रदीप एम.महाजन यांनी कामकाज पाहिले. केसवॉच म्हणून पाचोरा पोलीस स्टेशनचे शिपाई मनोहर पाटील पैरवी अधिकारी म्हणून पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अनिल सपकाळे यांनी सहकार्य केले.