आडगावात उसनवारीच्या पैश्यांवरून एकाला मारहाण

यावल : तालुक्यातील आडगाव येथे उसनवार दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला कुर्‍हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली.या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल पोलिसात गुन्हा दाखल
सुरेश मकडू पाटील (50, रा.आडगाव, ता.यावल) हे कुटुंबियांसह वास्तव्याला असून त्यांनी गावातील योगेश मुरलीधर पाटील याला उसनवारीने पैसे दिले होते. बुधवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी सुरेश पाटील यांनी उसनवारीने दिलेले पैसे योगेशकडे मागितले होते. याचा राग योगेशला आल्याने त्याने कुर्‍हाडीच्या दांड्याने सुरेश पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी योगेश पाटीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.