आडगाव अपघातातील खडक्याच्या महिलेचा मृत्यू

यावल : तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवीचे दर्शन करून परतणार्‍या भाविकांच्या अ‍ॅपे रीक्षाला अपघात होऊन एक महिला ठार तर सात भाविक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या अपघातात मालती रवींद्र वराडे (54, रा.खडका) या महिलेचा मृत्यू झाला.

वळणावर उलटली रीक्षा
शुक्रवारी श्री मनु देवी मंदिरावरून दर्शन घेऊन काही भाविक अ‍ॅपे रीरक्षाद्वारे परत येत होते. आडगाव ते श्रीक्षेत्र मनु देवी मंदीर दरम्यानच्या रस्त्यावरील वळणावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भाविकांची अ‍ॅपेरिक्षा अचानक एका बाजूला उलटल्याने या अपघातात भाविक जखमी झाले होते. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके, परिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, विजय शिंदे यांनी प्रथमोपचार केले. त्यातील मालती वराडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात सूर्यकांत वराडे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत वराडे यांच्यावर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार आदी करीत आहे.