चोरीतील 90 हजार हस्तगत ; आरोपीला न्यायालयाने सुनावली कोठडी
भुसावळ- शहरातील आठवडे बाजारातील आडत दुकानदाराच्या दुकानातील सुमारे एक लाखांची रोकड लांबवल्याची घटना 20 रोजी पहाटे उघडकीस आली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसा आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कुणाल वामन इंगळे (24, रा.पंचशील नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीस गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
एक लाखांच्या रोकडवर मारला होता डल्ला
शहरातील आठवडे बाजारात विजयकुमार चंद्रलाल लोकवाणी (49, गणेश कॉलनी, खडका) यांचे आडत दुकान असून दिवसभरातील व्यवहारापोटी त्यांनी रविवारी सायंकाळी व्यवहार आटोपून दुकान बंद करीत दुकानातील कपाटात 99 हजार 700 रुपयांची रोकड ठेवून घर गाठले होते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी दुकान उघडण्यास गेल्यावर त्यांना कपाटातील रक्कम चोरीस गेल्याचे आढळल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांत घरफोडीची तक्रार नोंदवली होती. पोलिस उपअधीक्षक गजाजन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुरुवारी आरोपीच्या आठवडे बाजार भागातून मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई हवालदार सुनील जोशी, विजय पाटील, किशोर महाजन, विकास सातदिवे, समाधान पाटील आदींच्या पथकाने केली. अधिक तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.