शिरूर लोकसभा मतदारसंघाची समीकरणे बदलणार
माजी आमदार लांडेंनाही करावा लागणार आमदार महेश लांडगेंचा प्रचार!
बापू जगदाळे, पिंपरी- चिंचवड : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आपापली रणनीती आखू लागला आहे. शिरूर मतदार संघाचे पर्मनंट खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव यांचा दबदबा आजही कायम आहे. येत्या लोकसभेला त्यांचा वारू रोखण्यासाठी भाजपाबरोबरच राष्ट्रवादीदेखील उत्सुक आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे यांना विद्यमान आमदार महेश लांडगे यांचा प्रचार करावा लागेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
आढरावांचा विजयाचा वारू
सलग तीनवेळा खासदार म्हणून जनतेने आढळराव यांना निवडून दिले आहे. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच आपल्या मतदार संघात लक्षवेधी विकासकामे केली आहेत. तळागाळातील लोकांशी असणारा त्यांचा संपर्क आणि प्रश्न सोडविण्याची हातोटी यामुळे त्यांचे लोकमताचे पारडे नेहमीच जड राहिलेले आहे. आजवर त्यांना हरविण्यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले; पण आढळराव शिरूरचा गड कायमच आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. जनमताचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे एकाही राजकीय पक्षाला त्यांना पराभूत करणे शक्य झाले नाही. शेवटी विरोधाला विरोध म्हणून त्यांच्यासमोर कमकुवत उमेदवार उभा करून त्याचा बळी देण्याची आता जणू प्रथाच पडली आहे.
भाजपा-राष्ट्रवादी एकत्रची चर्चा
आढळरावांची वाढती ताकद कमी करण्यासाठी येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. असे झाले तर राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांना भाजपाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांना खासदारकीसाठी मदत करावी लागणार आहे. एवढेच नव्हेतर लांडे यांना महेश लांडगे यांचा प्रचारही करावा लागेल, अशी अटकळ बांधली जात आहे.या साठी लांडेना भाजप मधून भोसरी विधासभेची उमेदवारी देण्याचीही अटकळ बांधली जात आहे.
लांडगेंना खासदारकीची उमेदवारी?
भाजपा-सेना युती तुटल्यातच जना आहे. त्यामुळे येत्या निवडणुका स्वबळावर लढल्या गेल्या तर शिरूर मतदार संघातून भाजपाचे उमेदवार म्हणून आमदार महेश लांडगे यांना संधी मिळू शकते. कारण आढळरावांना टक्कर देण्याएवढा तोडीचा दुसरा उमेदवार भाजपाकडे नाही. याशिवाय आमदार लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात आपला दबदबा निर्माण केला आहेच; शिवाय शिरूरमध्येही त्यांचा गट कार्यरत आहे. याचा फायदा त्यांना लोकसभेला होऊ शकतो, असे तर्क भाजपा कार्यकर्त्यांमधून लढविले जात आहे.
हे देखील वाचा
लांडे यांचे अजूनही तळ्यात-मळ्यात!
आढळराव यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला टक्कर देण्यासाठी भाजपा नव्या दमाचे आमदार महेश लांडगे यांना मैदानात उतरवू शकते. मात्र, राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचे मात्र अजूनही तळ्यात-मळ्यात चालले आहे. त्यामुळे आढळरावांच्या विरोधात उभा करण्यासाठी तेवढ्या ताकदीचा उमेदवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. म्हणूनच भाजपाला साथ देण्याचा विचार राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी करत आहेत. असा कयास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी भाजपाची ताकद वाढविणार?
जागा वाटपामध्ये शिरूर मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यात आलेला आहे. मात्र, भाजपा-सेना युती तुटली तर येत्या निवडणुका स्वबळावर लढविल्या जाणार, यात दुमत नाही. याच संधीचा फायदा घेऊन आढळरावांची ताकद कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला मदत करू शकते. कारण कधीकाळी खुद्द शरद पवार यांनादेखील शिरूरमधून पळ काढावा लागला होता आणि त्याचा वचपा काढण्याची ही संधी राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सोडणार नाही, असे बोलले जात आहे.
लांडेच्या नाराजीचा भाजपाला फायदाच?
लांडे यांनी गेली विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविली होती; पण राष्ट्रवादीनेच त्यांना पाडले हे आता काही लपून राहिलेले नाही. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विलास लांडे यांचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. त्यामुळेच लांडे यांना गरजेचे असून देखीलू विधानपरिषदेलाही संधी दिली गेली नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यातच आता महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांना विधानसभेची तयारी करण्यास सांगितले आहे, याची कानकून लागल्यामुळे विलास लांडे नाराज असल्याचे बोलले जात आहे. या जुळून आलेल्या संधीचा फायदा भाजपा घेऊ शकते. कारण भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप हे लांडे यांचे मित्र आहेत. त्यामुळे जगताप लांडेंना भाजपात घेण्यासाठी प्रयत्न करतील, अशी चर्चाही सुरू आहे.
लांडगे खासदार, तर लांडे पुन्हा आमदार?
भाजपाला शिरूर लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्याशिवाय भाजपाकडे दुसरा पर्याय नाही. लांडगे शिरूरमधून विजयी होणारच, असा ठाम विश्वास भाजपा वाटत आहे. त्यामुळे भोसरी विधानसभेच्या रिकाम्या झालेल्या जागेवर विलास लांडे यांना संधी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठीही भाजपा ताकद पणाला लावू शकते. त्यामुळे येत्या काळात आमदार लांडगे हे शिरूरचे खासदार तर विलास लांडे हे पुन्हा एकदा भोसरीचे आमदार असतील, असा तर्क व्यक्त होत आहे.
…तर नवल वाटायला नको!
2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विलास लांडे खासदारकीचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांच्या खासदारकीसाठी महेश लांडगे यांनी प्रचार केला होता. आता 2019 च्या लोकसभेसाठी लांडगे हे खासदारकीचे उमेदवार असणार आहेत. विलास लांडे हे जरी भाजपात गेले तरी महेश लांडगे यांचा प्रचार ते करणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.