‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली
पिंपरी-चिंचवड : शहरात कचर्याचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्यासाठीच ’वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प अत्यंत चांगला आहे. परंतु, शिवसेना कचर्याचे राजकारण करत आहे. प्रकल्पाची व्यवस्थित माहिती न घेता शिवसेनेचे नेते आरोप करत आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी अभ्यास करुन बोलावे, असे प्रत्युतर पालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मंगळवारी दिले. दरम्यान, ’वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.
महापालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे कचर्यातून वीज निर्मिती (वेस्ट टू एनर्जी) हा ‘डीबीओटी’ तत्वावरील अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अन्टोनी लारा एन्व्हायरो व ए. जी. एन्व्हायरो या दोन भागीदार कंपनीस 21 वर्षे कराराने डेपोची जागा भाडेतत्वावर देण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली.
वेस्ट टू मनी : सेनेचा आरोप
या प्रकल्पात प्रकल्पात मोठे गौडबंगाल आहे. मोठी गफलत झाली आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प नसून ‘वेस्ट टू मनी’ प्रकल्प आहे. कच-यातून नक्की किती वीज निर्मिती होईल हे माहिती नाही. परंतु, कचरा जाळून वीज निर्मितीच्या नावाखाली सत्ताधारी करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारणार आहेत, असा हल्लाबोल सोमवारी (दि.23) पत्रकारपरिषद घेऊन शिवसेनेने केला होता.
प्रकल्पाचे राजकारण नको
त्याला सभागृह नेते एकनाथ पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ’वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी पालिका केवळ ’टीफिन फी’ देत आहे. देशात विविध ठिकाणी वेगवगळे प्रकल्प आहेत. मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प वेगळा आहे. त्यामुळे शिवसेनेने या प्रकल्पाचे राजकारण करु नये. तसेच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शिवसेना लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप आगामी मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवेल.