आढावा भोसरी विधानसभा मतदार संघाचा
पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) : प्रमुख पक्षाचे शहरातील राजकारण आजही गावकी-भावकीच्या नेत्यांपुढेच फिरत आहे. म्हणूनच ज्या पक्षामध्ये स्थानिक नेतेमंडळी जास्त त्या पक्षाचा उमेदवार सर्व पदांवर निवडून येतो. त्याला महापालिकेबरोबरच विधानसभा व लोकसभाही अपवाद नाही. आजवरच्या येथील राजकारणाचे हेच सूत्र आहे. याला ज्यांनी छेद द्यायचा प्रयत्न केला, त्यांचे मोठे राजकीय नुकसानच झाले आहे. ज्याने ही तंत्र अवलंबले, त्यांना राजकीय फायदा. हे आताच्या महापालिकेच्या सत्ता परिवतर्तनातून पुन्हा एकदा सिध्द आले आहेच. त्यामुळे भोसरी मतदारसंघात मागील दोन निवडणुका पाहता पक्ष तिकीट हा फॅक्टर वरचढ न राहता अपक्ष; पण स्थानिक उमेदवार प्रबळ असे सुत्र तयार झाले आहे. त्यामुळे येथील गावकी भावकीचा फॅक्टर पुन्हा भोसरी विधानसभेच्या निवडणुकीत चालणार यात शंका नाही. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे, विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यातच पुन्हा थेट लढत होणार आहे. तरी देखील शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार असून अपक्ष विजयाची परंपरा खंडीत होणार का? याकडे शहराचे लक्ष लागणार यात शंका नाही.
नेहमीच चर्चेतील मतदारसंघ
शहराबरोबरच राज्यातही नेहमीच भोसरी विधानसभा मतदारसंघ चर्चेत असतोच. कधी रेडझोनमुळे, तर कधी वाढणार्या गुन्हेगारी घटनेमुळे तर कधी राजकीय हालचालीमुळे. शहरातील काही प्रमाणात ग्रामीण चेहरा असलेला मतदारसंघ म्हणून हा ओळखला जातो. यामध्ये चर्होली, डुडूळगाव, जाधववाडी, चिखली यासारख्या भागाचा समावेश होतो. औद्योगिक कंपन्याचेही जाळे या मतदारसंघात बरेच क्षेत्र व्यापते. म्हणून या मतदारसंघांमध्ये 70 टक्के मतदार हे कोणत्या ना कोणत्या कंपनीत कामगार म्हणून कार्यरत असलेले दिसतीलच. त्यातही सामान्य कष्टकरी वर्गाची लोकसंख्या जास्त. यामध्ये नव्वद टक्के लोकसंख्या ही देशाबरोबरच राज्यातील अनेक भागातून या ठिकाणी रोजगारासाठी येवून स्थिरावलेली असल्याचे दिसते. असे असले तरी या मतदार संघावर स्थानिक नेतेमंडळींच सत्ता अबाधित आहे.
अपक्ष विजयाची शक्यता कमी
त्यामुळेच नव्याने अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीने तत्कालीन आमदार विलास लांडे यांना तिकीट नाकारले तरी लांडे यांनी स्थानिक मंडळीच्या पाठबळावर अपक्ष राहून 2009च्या वेळी पुन्हा आमदारकीची माळ गळ्यात घातली होती. भोसरीचे प्रथम आमदार हे बिरूद लावले. तर त्यांच्याच राजकीय आखाड्यात तयार झालेले त्यांचे भाचेे जावई महेश लांडगे यांनी 2014 च्या वेळी मोदी लाट असताना देखील लांडे यांच्या विरोधात बंड पुकारुन लांडे विरोधक व स्थानिक गावकी-भावकीच्या जोरावर अपक्ष आमदारकी मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तसेच दुसरया वेळीही अपक्षाची परंपरा कायम ठेवली. पण त्याची पुनर्रावृत्ती आता होईल असे चिन्ह नाही.
महेश लांडगे सर्वच आघाड्यांवर वरचढ
आताची परिस्थिती वेगळी असून लांडगे यांनी भाजपाचे सहयोगी सदस्य स्विकारले आहे. आता ते लोकसभेसाठी देखील तीव्र इच्छुक आहेत; पण चालु लोकसभा व विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होताना दोघांत सहा महिन्यांचाच फऱक येतो. लोकसभेच्या निवडणुका या विधानसभेच्या सहा महिणे अगोदर येतात. त्यामुळे राज्यातील विधानसभादेखील लोकसभेबरोबरच घेण्याचा मानस भाजपा नेत्यांचा असल्याचे बोलले जाते. असे झाले तरच येथील अनेक नवीन राजकीय समिकरणे उदयाला येऊ शकतात. आज सर्वांनाच आमदार लांडगे सर्वच आघाड्यावर वरचढ ठरत आहेत. असे असले तरी मागील वेळी सारखी परस्थिती त्यांचीही नाही. मागील वेळी सर्वच पक्षातील लांडे विरोधकांची एकत्रीत ताकद लांडगे यांच्या पाठीशी होती; पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत ती विभागली गेली याचा तोटा लांडगे यांना किती प्रमाणात बसतो यावरच विरोधकांची गणित अवलंबून आहे.
राष्ट्रवादीला लांडेंशिवाय पर्याय नाही
लोकसभा व विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या झाल्यास आमदार लांडगे कोणाला पसंती देतात हे देखील महत्वाचे आहे. कारण यावरच भाजपाचे मागील उमेदवार व पालिकेतील सत्तारुढ पक्ष नेता एकनाथ पवार यांचा विधानसभा तिकीटाचा मार्ग मोकळा होणार आहे. तर भाजपामध्ये विधानसभेसाठी सध्या आमदार लांडगे यांच्या नंतर पवारच तिकीटासाठी प्रबळ दावेदार आहेत. तर राष्ट्रवादीमध्ये विलास लांडे यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. व जर लांडे मागील विरोधकांचे मन वळवण्यात यशस्वी झाले तर भाजपा विरोधी मतदान एकत्रीत केल्यास त्यांची बाजू निश्चितच वरचढ ठरु शकते यात शंकाच नाही.
शिवसेना नवा प्रयोग राबविण्याची शक्यता
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा इच्छुक असलेले शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल कलाटे यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी आपला पदाचा राजीनामा स्विकारावा अशी पक्षाकडे विनंती केली आहे. त्या धर्तीवर या रिक्त जागासाठी शिवसेनेमधुन मागील दोन वेळा भोसरी विधानसभेतून निवडणुकी लढवलेल्या सुलभा उबाळे यांची नाव प्रथम क्रमांकावर असल्याचे बोलले जात आहे. तर भोसरीतून सध्याही त्यांच्याशिवाय पक्षाकडे दुसरा पर्याय नाही. त्यातच उबाळे यांना खासदार आढळराव यांचा भक्कम साथ असल्यामुळे उबाळे यांनाच पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु अशा वेळी पक्ष वेगळा प्रयोग देखील राबविण्याच्या तयारीत आहे, असे त्यांच्या पक्षातील काही वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळेच भोसरीतील कामगार वर्गाची लोकसंख्या पाहता या वर्गात लोकप्रिय असलेले व सर्वच जाती-पातीतील त्यांच्या वैयक्तिक कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरु माथाडीचे नेते व बांधकाम सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष इरफान सय्यद यांची इच्छा नसल तरी देखील त्यांना निवडणुकीत उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.