पुणे : गेल्या सोमवारपासून 40 अंशांच्या जवळ पोहचलेला पारा रविवारीही 40 अंशांच्या पुढेच होता. सध्या सुरू असलेला भीषण उकाडा पुढील आठवड्यातही असाच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संपूर्ण राज्य तापमान वाढल्याने होरपळत आहे. रविवारी घोषित करण्यात आलेल्या देशातील सर्वाधिक दहा उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्राच्या तीन शहरांची नोंद झाली आहे. या यादीत केवळ राजस्थान आणि महाराष्ट्रामधील शहरांचीच सर्वाधिक नावे आहेत. खासगी हवामान संस्था स्कायमेटने प्रकाशित केलेल्या आकड्यांनुसार रविवारी पुणे शहरात 41 अं. से. तापमान नोंदविण्यात आले. किमान तापमानातही मोठी वाढ झाली असल्याने रात्री दिलासा देणारा गारवाही संपुष्टात आला आहे. किमान तापमानाच्या बाबतीतही पारा 22 अंश सेल्सियसवर अडकला आहे.
राजस्थान महाराष्ट्रात सारखेच तापमान
हवामान तज्ज्ञांच्या मते मार्चच्या मध्यापासून सुरू झालेला उकाडा सातत्याने वाढत आहे आणि वाढतच राहण्याची शक्यता आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात सातत्याने वाढणारे तापमान गेल्या 35 वर्षांमध्ये कधीही पहावयास मिळाले आहे. मार्च महिन्यात तापमानाने एप्रिलची सरासरी मागे टाकली होती तर या एप्रिल महिन्यातही सरासरीपेक्षा खूप अधिक आणि मे महिन्याप्रमाणे तापमान आहे. विशेषतः महाराष्ट्राचे तापमान आता राजस्थानच्या बरोबरीने वाढू लागल्यानेही चिंता व्यक्त केली जात आहे.
पुण्यात आजही उन्हाच्या झळा
उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान राजस्थान, गुजरात आणि दक्षिणेतील काही राज्यात नोंदविले जाते, परंतु मार्च महिन्याच्या मध्यापासूनच देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या दहा ठिकाणांच्या यादीत महाराष्ट्राची शहरे सातत्याने आहेत. कोकण आणि मुंबई सोडल्यास राज्यातील इतर बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पारा चाळीशी ओलांडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या शक्यतेनुसार सोमवारीही पुणे शहराचे तापमान 41 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. मंगळवार ते गुरुवार तापमान किंचित कमी होऊन 40 अंश सेल्सियस इतके असेल आणि शुक्रवारपासून पुन्हा तापमानात वाढ होऊन पारा 41 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कमाल तापमानासोबतच किमान तापमानात ही वाढ होण्याची शक्यता आहे.
फालोदी 46.5 तर चंद्रपूर 45.2
स्कायमेटवेदरने रविवारी सर्वाधिक तापमान असलेल्या दहा ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली असून ही संपूर्ण यादीत केवळ राजस्थान आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांचीच नावे जास्त आहेत. अर्थात देशात सर्वाधिक तापमान सध्या राजस्थान आणि महाराष्ट्रात आहे. देशात सर्वाधिक तापमान राजस्थानच्या फालोदी येथे 46.5 अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. तर देशात तिसर्या आणि महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानावर चंद्रपूरचे तापमान 45.2 अंश इतके नोदंविण्यात आले आहे.