इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे जनक आणि पहिले गव्हर्नर जनरल, काइद-ए-आझम, बॅरिस्टर महंमद अली जिना आणि पारशी कुटुंबात जन्मलेल्या त्यांच्या पत्नी, रत्तनबाई दिनशॉ पेटीट उर्फ रत्ती या दोघांचे एकमेव अपत्य असलेल्या दीना जिना अर्थात मिसेस दीना वाडिया यांचे गुरुवारी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क येथे वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे! त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1919 या दिवशी लंडनमध्ये झाला होता. गंमत अशी की त्यांचा वाढदिवस पाकिस्तानात जेव्हा 1947 साली आणि त्यानंतर पुढची दोन वर्षे, बॅ. जिना गव्हर्नर जनरल असतानाच्या काळात थाटात साजरा झाला. तेव्हा तो भारताच्या स्वातंत्र्य दिनाला साजरा होतोय याची सल मनाला टोचत असल्याने पाकिस्तानच्या सरकारने दीना जिना यांचा जन्म पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी झाला असल्याचा डांगोरा पिटला होता! बॅ. जिना हयात असतानाच्या काळातसुद्धा त्यांच्या या एकमेव कन्येने पाकिस्तानला कधीही भेट दिली नव्हती हे खरे तर विशेषच म्हणायला हवे! कराचीमध्ये जिनांचे 11 सप्टेंबर 1948 रोजी एका असाध्य आजाराने निधन झाले तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांनी जिनांच्या या कन्येसाठी विशेष विमान पाठवल्याने त्याच दिवशी त्या आपल्या मयत वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी आणि तेही अगदी पहिल्यांदाच पाकिस्तानला गेल्या होत्या तसेच आपल्या वडिलांच्या पार्थिवाची दफनक्रिया पूर्ण होताच त्या लगेचच स्वगृही परतल्यादेखील होत्या.
त्यानंतर तब्बल छप्पन्न वर्षांनंतर, म्हणजे 2004 साली मार्च महिन्यात त्या दुसर्यांदा पाकिस्तानला गेल्या. तेव्हा त्या आपले सुपुत्र नस्ली वाडिया आणि नातू नेस वाडिया यांच्यासोबत भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्याच्या शृंखलेतील अंतिम सामना पाहण्यासाठी लाहोरला गेल्या होत्या! दीना यांचा लंडनमध्ये जेव्हा जन्म झाला होता तेव्हा त्यांची आई, रत्ती, अवघ्या एकोणीस वर्षांची होती. बॅ. जिना आणि रत्ती यांच्यात पुढे बेबनाव होत गेला आणि दहा वर्षांच्या संसाराला पाठ फिरवून, रत्ती आपल्या मुलीला, दीनाला सोबत घेऊन मुंबईला आपल्या माहेरी, दिनशॉ पेटीट यांच्या घरी कायमची निघून आली. थोड्याच दिवसांनी रत्तीचे वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी मुंबईतच निधन झाले. त्यावेळी दिल्लीत असलेले बॅ. जिना हे रत्तीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला निघून आले. त्याच वेळी दहा वर्षांच्या चिमुरड्या दीनाची आपल्या वडिलांशी, बॅ. जिनांशी, पुनर्भेट झाली, तरी दीना पुढेही कायम आपल्या आजोळी राहून पारशी संस्कारातच लहानाची मोठी झाली. तिने नेव्हिल वाडिया या पारशी तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. बॅ. जिना यांना ते अजिबात रुचले नाही. संतापाच्या भरात त्यांनी आपल्या बंगल्याची मालकी आपल्या पश्चात आपली बहीण फातिमा जिना हिला देण्यात यावी असे इच्छापत्र केले आणि मुंबई उच्च न्यायालयात त्याची रीतसर नोंदणी केली. मात्र, दीनाचा विवाह ते रोखू शकले नाहीत. बॅ. जिनांच्या मृत्यूनंतर कितीतरी वर्षांचा अवधी लोटल्यानंतर, विशेषतः जीनांच्या इच्छापत्रात नमूद केलेल्या त्यांच्या भगिनी फातिमा जीना यांचाही मृत्यू झाल्यानंतर बॅ. जिना यांची एकमेव कायदेशीर वारस म्हणून दीना वाडिया यांनी त्या बंगल्यावर आपला मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. दीना वाडिया यांच्या निधनाने आता याही अध्यायाची समाप्ती झाली आहे!
– प्रवीण कारखानीस
9860649127