श्रीनगर/पुणे : जम्मू-काश्मीरसह उत्तरेत जोरदार शीतलहर पसरली असून, सोमवारी रात्री श्रीनगर शहराचे तापमान उणे 4.2 अंशसेल्सिअस इतके पोहोचले होते. तसेच, काश्मीर खोर्यातही नीचांकी तापमान पोहोचले असून, हवामान खात्याच्या माहितीनुसार, लेह येथे सर्वात कमी उणे आठ अंशसेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते. तसेच, कारगील शहराचे तापमानही उणे 7.1 अंश सेल्सिअस इतके होते. जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात जोरदार शीतलहर पसरली असून, त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्येही हुडहुडी पसरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणेसह पिंपरी-चिंचवडचे तापमान 10 अंश सेल्सिअसवर घसरले आहे. नाताळच्या संध्येला शहरातील तापमान 10.01 अंशसेल्सिअस इतके होते, अशी माहिती हवामान खात्याने दिली. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव शहराचे 9.04 तर त्या खालोखाल गोंदियाचे 9.8 सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. महाबळेश्वरचे दिवसाचे तापमान 13.9 अंशसेल्सिअस इतके होते.
काश्मीर खोर्यात गोठणबिंदू खाली तापमान
काश्मीर खोर्यात सद्या जोरदार शीतलहर आलेली आहे, त्यामुळे सरोवर व नद्या गोठलेल्या आहेत. शहरे व घाटी परिसरात तर घटदाट धुकेही दाटलेले दिसून येत आहेत. त्यामुळे दृश्यता अवघी 300 मीटर इतकी झाली आहे. गोठणबिंदूच्या खालीही तापमान गेल्याने संपूर्ण जम्मू व काश्मीर सद्या गोठून गेलेले आहे. ही शीतलहर उत्तर भारतासह खालीही पसरली असल्याने त्याचा मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील काही भागालाही फटका बसला असून, राज्यात हुडहुडी पसरली आहे. पुढील काही दिवस हे तापमान असेच घसरणीला राहील, अशी माहितीही हवामान खात्याच्यावतीने देण्यात आलेली आहे.
29 डिसेंबरपर्यंत शहरातील गारठा कायम
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील तापमान 29 डिसेंबरपर्यंत असेच कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, राज्यातील तापमानाचा पारा काही भागात आणखी घसरण्याचा अंदाजही वर्तविण्यात आलेला आहे. 29 डिसेंबरपर्यंत पुण्यातील रात्रीचे तापमान सरासरी 12 अंशसेल्सिअस इतके राहणार असून, हवेचा दाबही कमी राहणार आहे. त्यामुळे दम्याचा त्रास असलेल्या पुणेकरांना या काळात त्रास होऊ शकतो. उत्तरेकडे आलेली हीमलहर आणि दक्षिणेकडील अंदमान समुद्रावर आणि पश्चिम बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही शीतलहर निर्माण झाली असल्याची माहितीही हवामान खात्याच्यावतीने देण्यात आली.