मुंबई । बँकांचे कर्ज घोटाळे थआंबायचे नाव घेत नाहीत. पीएनबी नंतर आता आणखी दोन बँकांचे कर्ज घोटाळे उघडकीस आलेत. आयडीबीआय मध्ये 772 कोटींचा तर आयसीआयसीआयमध्ये 3 हजार 250 कोटींचा कर्ज घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. चंदा कोचर मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले. एप्रिल 2012 मध्ये हे कर्ज देण्यात आले होते. यातील 2,810 कोटी रुपये थकीत होते. 2017 मध्ये हे बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आले. त्यामुळे कोचर कुटुंबीय आणि धूत यांच्यातील हे सर्व व्यवहार आणि बँकेचे बुडालेले कर्ज हे आता संशयाच्या भोवर्यात आले आहे.त्यामुळे चर्चेचे मोहोळ उठले आहे.
तेलंगना, आंध्रमध्ये गैरव्यवहार
आयडीबीआय बँकेने तिच्या तेलंगण व आंध्र प्रदेशातील काही शाखांकडून सुमारे 772 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे जाहीर केले. यामुळे आयडीबीआय बँकेने समभाग 3.5 टक्क्यांनी पडले. आयडीबीआय बँकेत हा गैरव्यवहार आर्थिक वर्ष 2008-09 ते 2012-13 या काळात झाला आहे. मत्स्यशेतीसाठी तत्कालीन आंध्रप्रदेशांतील हैदराबादेतील बशीरबाग, गुंटूर, राजामुंद्री, भीमावरम व पालांगी येथील बँकेच्या शाखांतून गैरप्रकारे कर्जे दिली गेल्याचे उघड झाले आहे. अधिक चौकशी केल्यावर या सर्व कर्जांची रक्कम 772 कोटी रुपये होत असून यातील बरीचशी कर्जे काही उद्योजकांनी घेतली आहेत.
व्हिडीओकॉनला दिले कर्ज
व्हिडिओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटींचं कर्ज देणार्या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर गोत्यात आल्या आहेत. व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत आणि चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यात झालेले सर्व व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. बँकेच्या संचालक मंडळानं मात्र गैरव्यवहाराचे वृत्त स्पष्ट शब्दांत फेटाळले आहे.
घोटाळ्यात वरीष्ठांचाच हात
या पाचही शाखांतून वितरित झालेल्या कर्जांपैकी बहुतांश कर्जांसाठी हे उद्योजक हमीदार राहिले होते. यातील बरीचशी कर्जे मत्स्यतळे खोदण्यासाठी दिली गेली. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीच मत्स्यतळी तयार करण्यात आली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. या कर्जप्रक्रियेत तारण म्हणून ठेवण्यात आलेल्या मालमत्तांची किंमतही फुगवून सागितली गेली. कर्डे मंजूर करण्यामध्ये अनेक वरिष्ठ कर्मचार्यांचा हात होता असेही आता स्पष्ट होत आहे. तपास यंत्रणांकडून या व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व अफवा असून बँकेच्या संचालक मंडळाचा चंदा कोचर यांच्यावर विश्वास असल्याचे बँकेकडून सांगितले आहे.