पुणे एटीएसची पथकाची अंबरनाथमध्ये कारवाई
29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी, कसून चौकशी सुरु
पुणे : पाकिस्तानस्थित अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुणे व आकुर्डी येथून तीन संशयित दहशतवाद्यांना पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. त्यानंतर सोमवारी आणखी दोघांना एटीएसने अंबरनाथ येथून ताब्यात घेतले आहे. हे दोघेदेखील बांगलादेशातील प्रतिबंधित अनसरउल्लाह बांगला (एटीबी) या दहशतवादी संघटनेशी काम करत असल्याचे त्यांच्या चौकशीतून पुढे आले आहे. दहशतवाद्यांशी लिंकप्रकरणी पुणे एटीएसने एकूण पाच जणांना अटक केली असून, त्यांची अज्ञातस्थळी कसून चौकशी सुरु आहे. सोमवारी अटक केलेल्या दोघांना सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्यापुढे हजर केले असता, न्यायाधीशांनी त्यांना 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. आरोपीच्यावतीने अॅड. तोसिफ शेख, अॅड. साजीद शाह, अॅड. कुमार कलेल यांनी जामिनासाठी युक्तिवाद केला होता. या दोघाही आरोपींकडे बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड आढळून आले आहे.
एटीएसकडून अज्ञातस्थळी चौकशी सुरु
अल-कायदा व बांगलादेशातील प्रतिबंधित एबीटी या दहशतवादी संघटनांचे भारतातील नेटवर्क पुणे एटीएसने उद्ध्वस्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या दहशतवादी संघटनांचे संशयित दहशतवादी हे पुण्यासारख्या उच्चभ्रू शहरात वास्तव्यास होते. एटीएसने आतापर्यंत मोहम्मद हबीबउर रहेमान हबीब उर्फ राज जेसुब मंडळ (वय 31), मोहम्मद रिपन हुस्सेन उर्फ उबेत (वय 25) आणि हान्नन अन्वर खान उर्फ बाबुरली गाझी (वय 28) या तिघांना आकुर्डी व वनवाडी येथून शुक्रवारी (दि.16) अटक केली होती. या तिघांच्या कसून चौकशीतून आणखी दोघांची नावे समोर आलीत. त्यानुसार पुणे एटीएसच्या एका पथकाने अंबरनाथमध्ये छापे टाकून मोहम्मद अहत अली आणि मोहम्मद हसन अली या दोन संशयितांना अटक केली. त्यांना सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आली असता, न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या दोघांकडून पॅनकार्ड, आधारकार्ड हस्तगत करण्यात आली आहेत. हे संशयित अनधिकृतपणे भारतात वास्तव्यास होते, तसेच ते दहशतवाद्यांशी संपर्कत असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. मुंबईत अटक करण्यात आलेल्या दोघांचा पुण्यात अटक केलेल्या तिघांशी काही संबंध आहे का, याची माहितीही पोलिस घेत होते.
बनावट कागदपत्रे, सीमकार्डही हस्तगत
पकडण्यात आलेले पाचही संशयित दहशतवादी हे मागील पाच वर्षांपासून पुणे शहरात वास्तव्यास असून, त्यांनी खोटी नावे धारण करून भारतात पॅनकार्ड, आधारकार्ड व मतदान कार्ड बनविलेली आहेत. तसेच, त्यांच्याकडून फोन, सीमकार्ड आणि बनावट कागदपत्रेही हस्तगत करण्यात आलेली आहेत. या संशयितांनी बनावट कागदपत्रांच्याआधारे सीमकार्ड खरेदी करून त्याचा गैरवापर केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याची माहितीही एटीएसच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. अन्सारउलाह बांगला ही दहशतवादी टोळी भारतात बंदी घातलेल्या अल-कायदा या संघटनेशी कनेक्टेड आहे. या संघटनांशी संबंधित काही समाजकंटक या दहशतवाद्यांना भारतात लपून राहण्यासाठी व्यवस्था करत होते. तसेच, आर्थिक आणि इतरही प्रकारे दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देत होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली. या आरोपींवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक अधिनियम, बनावट पारपत्राद्वारे भारतात प्रवेश करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.