पुणे । पीएमपी अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी 14 वरिष्ठ अधिकार्यांना नियमांचा बडगा दाखवत पदावनत केले आहे. 2007 ते 2017 दरम्यान व्यवस्थापकीय संचालक किंवा भरती-बदली समितीची मंजुरी नसतानाही या 14 अधिकार्यांची बढती झाली होती. नव्या पदाची वेतनश्रेणीही त्यांना लागू झाली होती. हा प्रकार उघड झाल्यावर त्या अधिकार्यांना पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या 2007 च्या मूळ पदावर नियुक्त केले आहे.
पीएमपीमध्ये चार वर्षांच्या काळात सुमारे 500 हून अधिक अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बढत्या-बदल्या सर्व नियम डावलून झाल्याचे उघड झाले आहे. परिणामी कर्मचारी संख्या कमी होऊनही पीएमपीच्या उत्पन्नातील तब्बल 55 टक्के भाग हा वेतन आणि आनुषंगिक बाबींवर खर्च होत आहे. मनमानी पद्धतीने बढत्या देणे, तात्पुरती पदे निर्माण करणे, आदी विविध कारणांमुळे पीएमपीच्या आस्थापना विभागातील अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांना तेव्हाचीच वेतनश्रेणी लागू होणार आहे. मागील चार वर्षात काही पदे तात्पुरती निर्माण करायची, त्यावर नियुक्ती करून घ्यायची व नंतर त्या पदांवरून बढती घ्यायची, अशा प्रकारचा कारभार झाल्याचे दिसून आले आहे. यावर मुंडे यांनी निर्णय घेत 14 वरिष्ठ अधिकार्यांना पदावनत करत त्यांना 2007 मध्ये असलेली वेतन श्रेणी लागू केली.