पुणे । बारामती : पिंपळी येथील वादळात जखमी झालेल्या रुग्णांना भेटण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात गेले होते, त्यावेळी रुग्णालयाच्या इमारतीच्या रंगाचे पोपडे पडलेले त्यांनी पहिले. त्यानंतर त्यांचा पारा चढला, त्यांनी येथील अधिकार्यांची कानउघडणी करीत डागडुजीकरिता सांगत जा, आपणही पूर्वी निधी देत होतो, आम्ही अजून बेकार झालेलो नाही, असे सांगत अजून आपली निधी देण्याची पत असल्याची जाणीव प्रशासनाला करून दिली.
वादळात जखमी झालेल्या रूग्णांची घेतली भेट
वादळात जखमी झालेल्या नागरिकांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आमदार अजित पवार हे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात गेले होते. नेहमीप्रमाणे गाडीतून उतरून ते थेट रुग्ण दाखल असलेल्या वार्डात पोहोचले. यानंतर रुग्णांच्या अंगावर रुग्णालयाचा वेष पाहून ते म्हणाले की, रुग्णालय प्रशासन, रूग्णांना असेच कपडे नेहमी देते. की, आपण येणार असल्याचे समजल्याने दिले आहेत. नेहमी अशा सुविधा रुग्णालय सर्व रुग्णांना दिल्या जातात का, याचीही खातरजमा पवार यांनी करून घेतली. यानंतर रुग्णालयाबाहेर पडत असताना त्यांचे लक्ष रंग गेलेल्या भिंतींसह इमारतीच्या छताकडे गेले. छतावरील रंगांचे उडालेले पोपडे व भिंतींचा गेलेला रंग पाहून अधिकार्यांवर पवार चांगलेच भडकले. आमदार अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सर्व अधिकारी ते येणार असल्याचे कळताच उपस्थित रहायचे. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात ते आले असतानाही वैद्यकीय अधीक्षक अनुपस्थिती होते.