अधिवेशनाचा नववा दिवसही कर्जमाफीने गाजला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यात खडाजंगी झाल्याचा एकही दिवस गेला नाही. आजही मुंडे आणि पाटील यांच्यात खंडाजंगी झाली. त्यावेळी मात्र मुंडे यांनी न राहवून दादा, तुमच्या खिशातले शेतकर्यांना मागत नाही, असा टोला हाणला. मीही शेतकरी आहे. शेतकर्याचा मुलगा आहे. इथे बसलेल्या अनेकांची शेतकर्यांशी नाळ जुळली आहे. अशा भावनिक मुद्दयावर हात घातला. कर्जमाफीचा हा नववा दिवस आहे अशी आठवण विरोधी पक्षनेते मुंडे यांनी करून दिल्यानंतर आता नवरात्र संपली असाही आवाज सभागृहातून आला. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुद्देसूदपणे भाषण करीत, सरकारवर कडाडून टीका केली. सत्तारूढ पक्षाचे आमदार मंत्री हे वेलमध्ये येतात, ही कोणती लोकशाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी सभागृहात केलेल्या निवेदनाने अनेकांचे डोळे पाणावले. कृषीमंत्र्यांच्या गावात शेतकर्याने आत्महत्या केली. उस्मानाबाद येथे शेतकरी किडनी विकायला निघालाय. एका शेतकर्याने मुले विकायला काढली. शेतकर्यांना अजून काय़्-काय विकायला लागेल. ज्या शेतकर्यांंनी जीवनाचा शेवट केला, त्यांच्या विधवा स्त्रीयांना कोण न्याय देणार? असे भावनिक होत गजभिये यांनी शेतकर्यांच्या दु:खावर बोट ठेवलं. गजभिये यांचे भाषण सुरू असतानाच सगळे सभागृह स्तबध झालं होत. गजभियेंच्या रूपाने शेतकर्यांची वेदनाच बोलत होती. सगळ्यांचे डोळे पाणावले. प्रगत राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असेल तर काय उपयोग आहे. सर्वच सदस्यांनी ठराव करून 30 हजार कोटीचे कर्जाचा प्रस्तावासाठी शिफारस करावी अशीही मागणी गजभिये यांनी केली. गजभियेंचे भाषणानंतर सभा तहकूब झाली, मात्र त्यांचे भाषण ऐकून भाऊक झालेले सगळेच सदस्य त्यांच्या आसनाजवळ येऊन त्यांचे हस्तांदोलन करीत शेतकर्यांंची खरी वेदना मांडलीत त्याबद्दल त्यांचे कौतूकही केले. विरोधकांचा गोंधळ घोषणाबाजी ही नित्याचीच झाली आहे, मात्र आज विरोधकांनी वेगळीच घोषणाबाजी केली. दिल्लीचा पोपट काय म्हणतो कर्जमाफी नाय म्हणतो, मुंबईचा पोपट काय म्हणतो कर्जमाफी नाय म्हणतो. ही घोषणा नवव्या दिवशी मात्र नवीन होती.
संतोष गायकवाड – 9821671737