दापोडी । दापोडी रेल्वे स्थानकाशेजारील रेल्वे रुळास तडा गेल्याचा प्रकार येथील दोन तरुणांच्या लक्षात आल्याने आणि त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे येथील रेल्वेची मोठी दुर्घटना टळली. दापोडी रेल्वेस्थानका शेजारील गुलाबनगर वसाहतीतील तरुण मिलिंद भगवान शिंदे (29) व अतुल भिमराव खंडागळे (30), हे दोघे रविवारी दुपारी 11.45 वाजता रेल्वे लगत असलेल्या घराशेजारी गप्पा मारत थांबले होते. तेव्हा रेल्वे रुळावरून जाणार्या गाड्यांमुळे रुळांचा एक वेगळाच प्रकारचा आवाज त्यांच्या कानावर आला. रेल्वे जाताना नेहमीप्रमाणे येणार्या रुळाच्या आवाजापेक्षा वेगळाच आवाज असल्याने त्यांच्या मनात शंका आली. त्यांनी तातडीने रेल्वे रुळाकडे धाव घेऊन पाहणी केली असता रेल्वे रुळास दोन-तीन इंचाचा तडा गेल्याचा प्रकार निदर्शनास आला. शिंदे व खंडागळे यांनी तातडीने शंभर नंबर वर पोलिसांना ही बाब कळवली.
मात्र त्यांनी ही बाब रेल्वे पोलिसांच्या अखात्यारित असून तुम्ही त्यांना कॉल करा असे सांगत मदत करण्याऐवजी त्यातून अंग काढून घेतले. अखेर दोघांनी दापोडी रेल्वे स्थानकाकडे धाव घेत तेथील स्टेशन व्यवस्थापक विरेश अंबिगीरी यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने गेटमनला सूचना करीत पुण्यावरून मुंबईकडे जाणार्या रेल्वे गाड्या मागील रेल्वे स्थानकात थांबविण्यास सांगितले. गेटमनने सूचनेची अंमलबजावणी करणेपर्यंत खडकी रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणारी मालगाडी बोपोडी रेल्वे पुलावरून पुढे आली होती. मात्र या सर्वांच्या प्रयत्नांमुळे मालगाडी इंजिन ड्रायव्हरपर्यंत अखेर संदेश गेला व मालगाडीचे तीन ते चार डब्बे तडा गेलेल्या रुळावरून सुखरुपरित्या गेले व पुढे गाडी थांबली. सुदैवाने मोठी दुर्घटना टाळण्यात रेल्वे पदाधिकारी व या दोन तरुणांना यश आले.
ही माहिती मिळताच पुणे रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक बी.के.दादाभोय, तसेच इतर अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. येथील तडा गेलेल्या रेल्वे रुळाची प्रथम तात्पुरती दुरुस्ती करून थांबलेली मालगाडी संथ गतीने रवाना केली. मंगळवारी रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागले.