…आणि नारायण राणेंच्या गजाली

0

साधारणतः 2000-01 साली राज्यात शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या नारायण राणे यांच्याविषयी त्याकाळीही अनेक चर्वित किस्से राजकारणात सांगितले जात होते. त्यातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना हटवून मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापासून ते राज्याच्या अनेक भागात शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद देत त्याला निवडून आणण्यापर्यंतची रसद राणे यांनी पुरविली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर नारायण राणे यांना मानणारा एक स्वतंत्र गट शिवसेनेतच निर्माण झाला होता.

नंतरच्या सत्तांतराच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळविण्यात त्यांना यश आले नाही. त्यातच शिवसेनेत त्यावेळचे कार्याध्यक्ष आणि आताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उदय झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला आणि राजकीय वारूला लगाम लागण्यास सुरुवात झाली. नारायण राणे यांचे त्यावेळचे सहकारी असलेल्या अनेक शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यास हातभार लावल्याने राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच एकटे पडण्याची वेळ आली. त्यामुळे स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला पूर्णता देणार्‍या पक्षाच्या शोधास राणे यांनी सुरुवात केली.

राज्याच्या राजकारणात चाणाक्ष असलेल्या आणि आपल्या मधाळ वाणीने भल्या-भल्यांना चक्रावून सोडणार्‍या स्व. विलासराव देशमुख यांच्या संपर्कात राणे आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी विलासराव देशमुख यांनीही राणेंना काँग्रेस पक्षाचे आमंत्रण देत त्यांना पक्षात प्रवेश मिळवून दिला. तसेच राणे त्यांच्या सोबत असलेले जवळपास 14 आमदारही त्यांनी काँग्रेसमध्ये आणले. त्यावेळच्या झालेल्या काँग्रेस आणि राणे यांच्यातील चर्चेनुसार राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा काही राणे यांच्या हाती पुन्हा आली नाही.

त्यामुळे नाराज झालेल्या राणे यांनी काही दिवसांनंतर पुन्हा विलासराव देशमुख आणि काँग्रेसच्या एकंदरच कारभारावर टीका करण्यास सुरुवात केली. त्याचे तीव्र पडसाद जरी लगेच काँग्रेसमध्ये उमटले नाहीत. तरी त्याची दखल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेत हळूहळू राणे यांचे महत्त्व कमी होण्यास सुरुवात झाली. शिवसेनेत असताना कोकणात शिवसेनेशिवाय कोणताही पक्ष वाढू दिला नाही. पक्षांतरानंतर काँग्रेसवासी झालेल्या राणेंनी हेच धोरण अवलंबित त्यावेळचा काँग्रेसचा सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला तेथे प्रसार करू दिला नाही.

दरम्यानच्या काळात कोकणात राणे म्हणजे गुंडगिरी, दहशत अशा प्रकारचे आरोप होण्यास सुरुवात झाली. त्यास राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनीही त्यास हातभार लावला. एकप्रकारच्या राणे यांच्या राजकीय गंडस्थळावर हल्ले होत त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आणण्याचे काम सुरू झाले. त्याचे फलित म्हणजे 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव. मात्र, या पराभवाने खचून जातील ते राणे कसले. त्यांनी पुन्हा मुंबईतील वांद्रे विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लढविली. अपेक्षेनुसार त्यात त्यांचा पराभवही झाला. मात्र, त्यांच्या राजकीय धाडसाचे कौतुकही झाले.

राजकारणात वेळ साथ देत नसल्याने आणि त्यातच स्थानिक जनतेत त्यांच्या विरोधात वाढत असलेली नाराजी, पक्षात वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना सातत्याने डावलले जाणे, या गोष्टींमुळे राणे यांच्या तापट स्वभावात वाढ होत राहिली. राणे हे मूळचे शिवसैनिक असल्याने त्यांना काँग्रेसी राजकारणात अद्याप स्वतःचा जम बसविता आला नाही. त्यामुळे सातत्याने राणे यांना पक्षाचे लक्ष वेधण्यासाठी पक्षाच्या कारभाराबाबत आणि दिल्ली हायकंमाडच्या विरोधात टीका करतात. मात्र, या टीकेमुळे त्यांचे स्वतःचेच मोठ्या प्रमाणावर राजकीय नुकसान होत असल्याचे कदाचित त्यांच्या निदर्शनास आले नसावे.

त्यातच राज्यात आणि केंद्रात आलेल्या भाजप सरकारने त्यांच्या व्यवसायातील आर्थिक उलाढालीवर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेचे चौकशी लावली. तसेच त्यांच्या इतर व्यवसायावर बारीक लक्ष ठेवण्यासही सुरुवात झाली. त्यामुळे एकाबाजूला राजकीय कारकीर्द धोक्यात तर दुसर्‍याबाजूला आर्थिक नाकेबंदी या दुहेरी संकटात राणे सापडले. त्यातच काँग्रेस पक्षातही त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजी असल्याने त्यांच्या समस्येवर उतारा शोधण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे वेळ नाही. यापार्श्‍वभूमीवर काँग्रेसमधील आपले स्थान तपासण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांनी इतर पक्षांचे दरवाजे तपासायला सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळात त्यांच्या भाजपमधील वरिष्ठ नेत्यांशी होत असलेल्या बैठका त्यात मिळणारी आश्‍वासने यासह अनेक गोष्टी प्रसारमाध्यमात बातम्यांच्या स्वरूपात येत होत्या. या वार्तांकनांचे दस्तुरखुद्द राणे यांनी कधी खंडन केले नाही की, त्याचे समर्थन केले नाही. मात्र, त्याविषयीचे खंडन करणारे खुलासे त्यांचे चिरंजीव करत होते. त्यामुळे पहिल्या पक्षांतराच्या धर्तीवर पुन्हा एकदा राणे पक्षांतर करणार असल्याचे अनेकजण गृहित धरत होते.

याच चर्चांच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अहमदाबाद येथे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीला जात असल्याची चित्रफीत उघडकीस आली. त्यामुळे प्रसारमाध्यमात सुरू असलेल्या चर्चांना एकप्रकारे पुष्टीच मिळाली. नेहमीप्रमाणे राणे यांनी ती चित्रफीत खोटी असल्याचा खुलासा करत त्यातील मी तो नव्हेच, असा पवित्रा घेतला. मात्र, त्यांचा हा खुलासा फारसा कोणी गांभीर्याने घेतला नाही. फक्त काँग्रेसच्या दिल्लीतील काही वरिष्ठ नेत्यांनी याची गंभीर दखल घेत माजी खासदार मिलिंद देवरा आणि माजी मंत्री नसीम खान यांना राणे यांच्या भेटीसाठी पाठवले. त्यातील यथोचित चर्चेचा निष्कर्ष दिल्ली दरबारी पोहोचला. त्यानुसार काँग्रेसकडून पुन्हा त्यांना कोणतीही विचारणा झाली नाही. नेमक्या याच कालावधीत काही प्रसारमाध्यमातून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या. मात्र, त्या तारखांनुसार राणेंचे पक्षांतर झालेच नाही. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांनी राणेंना बोलाविल्याची चर्चा सुरू झाली. त्यानुसार पटेल यांच्या भेटीसाठी ते दिल्लीत पोहोचलेही मात्र त्यांची आणि पटेल यांची भेट काही होवू शकली नाही. त्यामुळे राणे यांना आल्यापावली पुन्हा मुंबईचा रस्ता धरावा लागला. यासर्व पार्श्‍वभूमीवर नारायण राणे यांच्याविषयीच्या चर्चा राज्याच्या राजकारणात मध्यस्थानी आल्या. परंतु, अखेर त्या गजालीच ठरल्या.
गिरिराज सावंत- 9833242586