गेल्या अनेक महिन्यांपासून गुजरातमधून विकास वेडा झालाय या हॅशटॅगने सुरू झालेला प्रवास चरमोत्कर्षावर पोहोचत असताना आता चक्क विकासच अदृश्य झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय राजकारणातील अटळ शोकांतिकेच्या अध्यायाची पुनरावृत्ती यातून दिसून आली आहे. राजकारण्यांच्या थिल्लरपणाला गुजरातमधील विकास बळी ठरल्याची बाबदेखील यातून स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असणार्या नरेंद्र मोदी यांची निवड करताना दोन प्रमुख बाबींचा विचार केला होता. एक तर मोदी यांची मुख्यमंत्रीपदाची वाटचाल ही विकासाभिमुख होती आणि अर्थातच हिंदुत्वाचा प्रखर चेहरा म्हणून ते ओळखले जात होते. 2014च्या निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी चलाखीने विकासाचा मुद्दा समोर केला. मुळातच यूपीए-2च्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली असताना मोदींनी विकासाचे स्वप्न दाखवल्यामुळे भाजपला या निवडणुकीत दणदणीत यश मिळाले. तेव्हापासूनच मोदीच नव्हे, तर त्यांचे सर्व सहकारी आणि भारतीय जनता पक्षदेखील विकासनामाचा जप करू लागला. आधी नाराजीचा सूर उमटला, मग खदखद सुरू झाली. खरे तर समाजमाध्यमांमध्ये अतिशय आक्रमक असणार्या भाजपच्या ट्रोल आर्मीलादेखील याचा प्रतिकार करता आला नाही. यातून पहिल्यांदा भाजप या मुद्द्यावरून बचावात्मक पवित्र्यात आल्याचेही दिसून आले. या पार्श्वभूमीवर, गुजरात निवडणुकीत विकास हाच एकमेव मुद्दा राहणार असल्याचे स्पष्ट झाले. तसे झालेदेखील. कारण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप करत भाजपची भंबेरी उडवली. त्यांच्या जाहीर प्रश्नांना उत्तर देताना भाजप नेत्यांची तारांबळ उडत असल्याचेही दिसून आले. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये हे चित्र अचानक बदलले.
मुळातच गुजरातमध्ये अनेक पातळ्यांवरून खदखद सुरू आहे. कथित विकासाची फळे हे समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचली नाही. विशेष करून दलित आणि अल्पसंख्याकांच्या मनात परिघावर फेकले गेल्याची सल आहे. उनामध्ये गोरक्षकांनी दलित तरुणांना केलेल्या मारहाणीचे व्यापक पडसाद उमटले आहेत. यातच पटेल आरक्षण आंदोलनामुळे या राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा समाज घटक दुखावला गेला आहे, तर अलीकडेच नोटाबंदी आणि जीएसटीच्या दुहेरी फटक्यामुळे भाजपची पारंपरिक मतपेढी मानला जाणारा व्यापारी वर्ग जेरीस आला आहे. या सर्व बाबींचा विचार करून राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने भाजपला चांगलेच घेरले. तथापि, काही दिवसांपूर्वी आपल्या वाह्यात बडबडीसाठी कुख्यात असणार्या मणिशंकर अय्यर या काँग्रेस नेत्याने भाजपला आयती संधी दिली. राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्यांना दुसर्या राजघराण्यांचे उदाहरण देता आले असते. तथापि, उच्चशिक्षित असणारे व सनदी अधिकारी म्हणून विविध जबाबदार पदांवर कामगिरी बजावणार्या अय्यर यांच्या मुखात मोगल घराण्याचे नाव आले अन् घात झाला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा हातोहात उचलून राहूल गांधी यांच्या आगामी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला औरंगजेबाजी राजवट म्हणून टाकले. येथून गुजरातच्या निवडणुकीतील विकासाच्या मुद्द्याला पहिला धक्का बसला, तर अयोध्येतील राममंदिरावर सुरू असणार्या सुनावणीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी घेतलेल्या भूमिकेनेही वाद झाला, तर काही दिवसांतच मणिशंकर अय्यर यांच्याच नीच शब्दयुक्त बडबडीने आगीत तेल ओतले. राहुल गांधी यांनी कानपिचक्या दिल्यानंतर त्यांनी माफी मागितली, तरी हे करत असताना आपणास हिंदी येत नसल्यामुळे नीच शब्दाचा अचूक अर्थ माहीत नसल्याचा आव आणण्यास ते विसरले नाही. मात्र, भाजपला या मुद्द्याचा लाभ होण्याची शक्यता गृहीत धरून अय्यर यांना काँग्रेस श्रेष्ठींनी पक्षातून निलंबित करत या प्रकरणापासून स्वत:ला वेगळे करण्याचा प्रयत्न केला. तथापि, या एका धक्क्यामुळे गुजरातच्या निवडणुकीतला विकास जवळपास अदृश्य झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान तोंडावर आले असताना अय्यर यांच्या बेताल बोलांनी काँग्रेसला बचावात्मक मुद्रेत आणले आहे, तर आजवर तणावात असणार्या भाजपच्या गोटात उत्साहाला उधाण आले आहे. अर्थात ही लढाई आता मुद्द्यांवरून भावनांवर आली असून, याच्या केंद्रस्थानी विकास नव्हे, तर गुजरातची अस्मिता आल्याचे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.
प्रत्येक राजकीय पक्षात वाचाळवीरांची खास ब्रिगेड असते. कुणावर टीका करण्यासाठी त्यांचा वेळोवेळी उपयोग होत असतो. यामुळे पक्षश्रेष्ठी अनेकदा मूकसंमतीच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधत असतात. तथापि, सनदशीर टीका करणे वा समर्पकतेने खिल्ली उडवणे आणि सभ्यतेचे सर्व संकेत गुंडाळून वाह्यात बडबड करणे यांच्यातील सीमारेषा इतकी धूसर असते की, ती भल्याभल्यांना समजत नाही. यामुळे तो व्यक्ती तर तोंडघशी पडतोच, पण त्याच्या पक्षाचीही अवघडल्यागत स्थिती होते आणि ऐन निवडणुकीच्या धामधुमीत असे झाल्यास काय होते? हे अय्यर पुराणातून दिसून येत आहे. यामुळे मुद्द्यांवरून गुद्दे आणि विकासावरून भावनेवर आधारित राजकारण सुरू होत असते. गुजरातच्या निवडणुकीत वाचाळवीरांनी पुन्हा एकदा भारतीय राजकारणातील या शोकांतिकेचा अध्याय सुरू ठेवला आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांना निलंबित करून सकारात्मक पाऊल उचलले आहे. भाजप व एकंदरीतच संघ परिवारातील मान्यवर काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर बर्याचदा खालच्या स्तरावरून टीका करत असताना त्यांनी हा निलंबनाचा धडा लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. असे झाल्यास किमान देशातील लोकशाहीमूल्ये तरी जिवंत राहतील. गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेला विकास मात्र सध्या अदृश्य झालाय. गुजरात विधानसभेचे रणांगण जिंकणारा पक्ष आपल्या विजयानंतर पुन्हा एकदा विकासाची भाषा सुरू करेल. तोवर कुणीही त्याला शोधण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ ठरणार आहे.