नवी दिल्ली । लोकशाही व्यवस्था ही देशाची खरी शक्ती आहे. देशाच्या विकासासाठी लोकशाही बळकट करणे आवश्यक असताना 25 जून 1975 या रात्री मात्र देशात तडकाफडकी आणीबाणी घोषित करण्यात आली. ती लोकशाहीसाठी काळरात्री ठरली, अशा शब्दांत रविवारी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात आणीबाणीच्या काळातील आठवणी ताज्या करून काँग्रेसवर निशाणा साधला.
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आणीबाणी
‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 33 व्या भागाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी देशवासीयांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी लगेचच थेट आणीबाणीच्या विषयाला हात घातला. आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांची परिस्थिती बिकट होती. लोकशाहीवर प्रेम करणारी व्यक्ती आणि भारतातील एकही नागरिक ती काळरात्र विसरू शकत नाही. संपूर्ण देशाला कारागृहाचे स्वरूप आले होते. विरोधकांचा आवाज दाबला जात होता. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह असंख्य नेते तुरुंगात होते. न्यायव्यवस्थाही आणीबाणीच्या संकटातून वाचू शकली नव्हती, असे सांगत मोदींनी यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लिहिलेली एक कविताही वाचून दाखवली.
स्वच्छता अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप
21 जून या आंतरराष्ट्रीय योगदिनी संपूर्ण जग योगमय झाले होते. योगाच्या माध्यमातून जग एकत्र येऊ शकले, असे सांगत स्वच्छता अभियान हा आता केवळ सरकारी कार्यक्रम राहिला नसून या अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप आल्याचे मोदी म्हणाले. इस्रोची मोहीम आणि किदम्बी श्रीकांतच्या विजयाचाही मोदींनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला. विजयासाठी मोदींनी श्रीकांतचे अभिनंदनही केले.
काँग्रेसविरोधी जनमत करण्याचे फर्मान
आणीबाणीच्या काळात काँग्रेसने घेतलेले अन्यायी निर्णय आणि त्याचे उमटलेले तीव्र पडसाद असे सर्व मुद्दे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक काँग्रेसविरोधी जनमत निर्माण करण्याचे आदेश भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार यांना देण्यात आले आहेत.