मुंबई: महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर लागलीच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली. कर्जमाफी योजनेला सुरुवात देखील झाली असून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम देखील जमा होत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले असून यात सरकारने कर्जमाफीची आकडेवारी जाहीर केली आहे. दरम्यान आज रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला?, त्यासाठी किती पैसे लागले? याची माहिती दिली आहे. आतापर्यंत ११ हजार ४६८ कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. अजित पवारांनी टि्वटरवरून ही माहिती दिली आहेत.
१३ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख २ हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,४६८.३६ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.
अजित पवार यांनी आणखी एक टि्वट करून कोणत्या बँकांमध्ये किती रक्कम जमा केली, हेही स्पष्ट केले आहे. त्यांनी टि्वट केले की, “जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४ हजार ४४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ५२७५.८६ कोटींची तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ७ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांच्या खात्यात ६१९२.५० कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.”