पिंपरी-चिंचवड : शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी महापालिका सरसावली आहे. यापुढे अनधिकृत फलक लावणार्याला ठेकेदाराला एक फलकामागे महिन्याला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबत स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
50 कोटी उत्पन्नाचे लक्ष्य
शहरात फलक लावणारे 58 ठेकेदार असून शहरात 1849 जाहिरात फलक आहेत. त्यापैकी केवळ 27 जाहिरात फलक अधिकृत असल्याचे समोर आले आहे. तसेच विनापरवाना बांधलेल्या इमारतींवर मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत, असे प्रशासनाने सांगितले आहे. जाहिरातबाजीचे परवाने देण्याच्या माध्यमातून महापालिकेला मिळणार्या उत्पन्नाबाबत स्थायी समितीत जोरदार चर्चा झाली. जाहिरात फलकाच्या माध्यमांतून पालिकेला वर्षाकाठी केवळ आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. जाहिरातीच्या माध्यमातून पालिकेला 30 ते 35 कोटी रुपये उत्पन्न मिळाले पाहिजे. तसेच 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष्य आहे, असे सावळे यांनी सांगितले.
होणार दंड
शहरभर पोलवरील लावण्यात आलेल्या जाहिरातीच्या छोट्या फलकातून महापालिकेला एक रुपयाही मिळत नसल्याचे समोर आले. तसेच छोट्या जाहिराती करण्यासाठी महापालिकेने आजपर्यंत निविदाच काढली नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिकेच्या अटी व शर्तीनुसार शहरात जाहिरातबाजी केलेल्या ठेकेदारांना प्रति जाहिरात फलकामागे महिन्याला दहा हजार रुपये दंड ठोठावण्याच्या सूचना स्थायीने प्रशासनाला दिल्या आहेत.
जाहीरात परवान्याचे दर वाढणार
पालिकेचे जाहिरातीचे दर खूप कमी आहेत. जाहिरातीचे दर वाढविणे गरजेचे आहे. दर वाढविण्यासाठी प्रशासनदेखील सहमत आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जाहिरात परवान्याचे दर वाढविण्यात येणार आहेत. त्याबाबतचा नवीन ठराव करुन प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे, सीमा सावळे यांनी सांगितले.