आता अमेरिकाही घालणार टिकटॉकवर बंदी?

0

वाशिंग्टन: भारत-चीन संबंध ताणले गेल्यानंतर आणि चीनकडून विविध सोशल मीडियातील अ‍ॅप्सच्याद्वारे वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरी करत असल्याच्या आरोपाखाली भारताने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता अमेरिकादेखील चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी याबाबत सुतोवाच केला आहे. लडाख सीमेवरील भारतीय सैनिक आणि चीनी सैनिकात रक्तरंजित संघर्ष झाला. त्यामुळे संबंध ताणले गेले होते. तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि व्यक्तिगत माहिती चोरी करत असल्याच्या शंकेवरून भारत सरकारने २९ जून रोजी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटलं. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही सांगण्यात आले आहे.