नवी दिल्ली : आधारचा डेटा सुरक्षित नसल्याचे माध्यमांनी उघड केल्यानंतर आधारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब युआयडीने गांभीर्याने घेतली असून आधारचा डेटा अधिक सुरक्षित करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आधारच्या 12 आकड्यांऐवजी आता व्हर्च्युअल आयडी आणण्याची योजना सरकारने आखली आहे. याद्वारे प्रत्येक आधार कार्डचा एक व्हर्च्युअल आयडी तयार करता येणार असून तो बदलता राहणार आहे. यामुळे नागरिकांना त्यांचा 12 आकडी आधार क्रमांक कोठेही देण्याची गरज भासणार नाही. तर 16 आकड्यांचा व्हर्च्युअल आयडी द्यावा लागेल. ही सुविधा 1 जूनपासून अनिवार्य होईल.
व्हर्च्युअल क्रमांक द्यावा लागेल
1 मार्चपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर 1 जूनपासून ती अनिवार्य करण्यात येणार आहे. म्हणजेच 1 जूनपासून सर्वच एजन्सींना ही योजना राबवण्यासाठी सोय करावी लागणार आहे. यानंतर कोणतीही एजन्सी व्हर्च्युअल आयडी स्विकारण्यास नकार देऊ शकणार नाही. हे मर्यादित केवायसी असेल. यामुळे संबंधित एजन्सींना देखील आधारची डिटेल मिळवण्याची परवानगी नसेल. या एजन्सीदेखील केवळ व्हर्च्युअल आयडीच्या आधारे सर्व काम पूर्ण करु शकेल. यामुळे बँका, फोन कंपन्या किंवा इतर योजनांसाठी आधार क्रमांक देण्याऐवजी हा व्हर्च्युअल क्रमांक द्यावा लागेल या क्रमांकावर संबंधीत एजन्सीला ग्राहकाचे छायाचित्र, घराचा पत्ता आणि नाव यांसारखी माहिती उपलब्ध होऊ शकेल. मात्र, ग्राहकाचा आधार क्रमांक मिळणार नाही. काही सेकंदानंतर नवा व्हर्च्युअल आयडी तयार होणार असून नवा क्रमांक तयार झाल्यानंतर दुसरा क्रमांक तत्काळ रद्द होणार आहे. त्यामुळे ग्राहकाच्या आधार क्रमांकापर्यंत कोणालाही पोहोचता येणार नाही. किंवा या क्रमांकाची गरजही पडणार नाही. त्यामुळे आधारचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहिल, असा दावा युआयडीने केला आहे, अशी माहिती युआयडीने दिली आहे.