आता आधार पे अ‍ॅपने करा कॅशलेश व्यवहार

0

नवी दिल्ली। आयडीएफसी बँकेने पहिला आधार अ‍ॅप लाँच केला आहे. ‘आधार पे अ‍ॅप’द्वारे ज्यांच्याकडे स्मार्टफोनदेखील नाही, अशा व्यक्तीही कॅशलेस व्यवहार करू शकतात, हे या अ‍ॅपचे वैशिष्ट्य आहे. आधार पे स्मार्टफोन पेमेंट अ‍ॅपचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे व्यापारी सवलत दर (मर्चंट डिस्काऊंट रेट) द्यावा लागणार नाही. एमडीआर म्हणजे क्रेडिट किंवा डेबिट कार्डची सुविधा पुरवण्याच्या मोबदल्यात बँकांकडून जोर सेवाकर लावला जातो त्याला एमडीआर असे म्हणतात. एखादा व्यापारी किंवा दुकानदार मोबाइलशिवायदेखील पैसे भरण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करू शकतो. कारण या अ‍ॅपद्वारे कॅशलेस व्यवहार करण्यासाठी मोबाइलची आवश्यकता नाही.

बोटांच्या ठशांचा पासवर्ड म्हणून वापर
हे अ‍ॅप वापरताना कोणत्याही वेगळ्या पासवर्डची गरज नाही. तुमच्या बोटांचे ठसेच पासवर्ड म्हणून वापरले जाऊ शकतात. म्हणजे पैशांचा व्यवहार करण्यासाठी बोटांचे ठसे किंवा बायोमेट्रिक डेटा प्रमाणित केला जाणार आहे. त्याशिवाय कोणताही व्यवहार पूर्ण होणार नाही. त्यामुळे दुसरा कोणी गैरफायदा घेण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. मात्र, त्यासाठी ग्राहकाने बँक खात्यांसोबत आपला आधार कार्ड क्रमांक जोडलेला असणे गरजेचे आहे.

10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करण्याची मर्यादा
कॅशलेस व्यवहारासाठीच या अ‍ॅपचा वापर केला जाऊ शकतो. याद्वारे कोणत्याही प्रकारचा फंड ट्रान्सफर करण्याचा पर्याय सध्या उपलब्ध नाही. मात्र, सध्या आधार पे अ‍ॅपद्वारे जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणे शक्य आहे.

सध्या केवळ अँड्रॉइड फोनवर उपलब्ध
सध्या हे अ‍ॅप केवळ अँड्रॉइड फोनवर उपलब्ध आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहारांत आधार पे अ‍ॅपचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणेही गरजेचे आहे. याद्वारेच युझर्सच्या बायोमेट्रिक डेटाची पडताळणी होऊ शकते. गुगल प्ले स्टोअरमधून आधार पे अ‍ॅप डाऊनलोड करावे. बायोमेट्रिक स्कॅनरद्वारे अ‍ॅप लिंक जोडावी. पैशांचा व्यवहार करण्यासाठी केवळ आपला आधार कार्डवरील क्रमांक अ‍ॅपमध्ये सबमिट करावा. ज्यात बँक खाते आहे तो पर्याय निवडून व्यवहार करावा. त्यानंतर बायोमेट्रिक स्कॅनर बोटांचे ठसे स्कॅन करून सत्यता पडताळून पाहणार.