आता आपले रक्षक आपणच

0

भीमा कोरेगाव पीडित कुटुंबातील पूजा सकट हिची हत्या झाली आहे. सरकारने वेळीच पुनर्वसन केले असते, तर आणि वेळीच आरोपींच्या मुसक्या आवळल्या असत्या तर आज पूजा आपल्यात असती. पण व्यवस्था आपल्या मुळांवर उठली आहे. अशात चळवळी विक्रीला निघालेल्या आहेत. जयंतीवर करोडो रुपये खर्चून नाचणारे आपण कधी भीमा कोरेगाव पीडितांसाठी देणगी द्यावी. त्यांचं पुनर्वसन समाजातून करावे असे वाटले नाही.

पूजा सकट बारावीची विद्यार्थी या भीमा-कोरेगाव हिंसाचारातील एक साक्षीदार होत्या. त्यामुळे त्यांना गावकरी धमक्या देत होते. याची कल्पना पोलिसांना देऊनही पोलिसांनी संरक्षण दिले नाही. हिंसाचारात पूजा सकट यांचे राहते घर जाळून टाकण्यात आले होते.घर जाळणारे लोक पाहिलेले असल्यामुळे पूजा या एक महत्त्वाच्या साक्षीदार होत्या. घरासाठी तीन महिने वणवण करूनही त्यांना मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाकडून मदत दिली गेली नाही. काल शेवटी त्यांनाच संपवण्यात आले. एका विहिरीत त्यांचा मृतदेह सापडून आला. दुसरीकडे अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कमकुवत केला गेला. मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांना क्लीन चिट जामीन दिला गेला त्यानंतरच हे घडले आहे. याचा तपास झाला पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसंदर्भात गैरफायद्याचा प्रोपोगंडा पसरवणारे अशावेळी शेपूट घालून बसतात. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा कुणी सत्तेवर असता तर आज या 19 वर्षांच्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला नसता. आता तरी आपली मते विकणे बंद करा, इथे दुःखाचे भांडवल करण्यात सर्व गुंतले आहेत, कधी मी कशाचे श्रेय घेईल यात अडकले आहेेत. पूजाने आत्महत्या केली किंवा तिची हत्या झाली हे उघड होईलच, पण आपली जबाबदारी काय होती हे आपण विसरून गेलो आहोत.

डीजेवर करोडो उधळणारे आपण आपल्यात कधी आपल्या समाजाच्या मदतीसाठीची पद्धत सुरू होईल कळत नाही. भीमा कोरेगाव जळाले, काही स्वतःच्या पायावर पुन्हा उभा राहिले, काही जण उद्ध्वस्त झाले, काही जण निघून गेले तर काही आजही तिथेच खितपत पडले आहेत. माध्यमांपुरती दिखाव्याची स्वार्थी चळवळ होत चालली आहे. सरकारला धारेवर धरले जात नाही, समाज धर्म म्हणून भूमिका नाही, जयंतीच्या वसुलीत दंग झालेले महाशयसुद्धा सर्वात पुढे अग्रेसर आहेत. पूजा तुला ही चळवळ न्याय देऊ शकली नाही. तुझ्यावरील अन्यायाला वाचा फोडू शकली नाही. गेंड्याच्या कातडीची सरकार 5000 रुपये देऊन थट्टा करते, तर पीडितांवरच खोटे गुन्हे दाखल करून पोलीस यंत्रणा शोषण करते. पूजा तू एक पुन्हा मुद्दा होशील, तू पुन्हा काही जणांच्या तिजोरीचा मोठा हिस्सा होशील. काही राजकारण करतील, काही सेल्फी काढतील. विकावू चळवळ करणार्‍यांनो किती दिवस आपण असे करोडोची मनोरंजनावर उधळण करणार आहोत आणि आपल्या समाजबांधवाला उघड्यावर पडणार आहोत.आता एक नवी लोकचळवळ उभी राहायला हवी. कोणाच्या आसर्‍याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. सत्ताधारी आणि विकावू चळवळ चालवणारे हे दोघेही या विकृत समाजव्यवस्थेचे एक भाग आहेत. साम्राज्यवाद्यांचे दलाल आहेत. आपले पुनर्वसन आपणच करू या. दलदलीतून समाजाला आपणच बाहेर काढू, असा विचार घेऊन पुढे या.

– राजू शिरधनकर
सामाजिक कार्यकर्ता,मुंबई
9324257259