आता आमदारकी लढवणार, तृतीयपंथी सरपंच ज्ञानेश्‍वर कांबळेंची घोषणा

0

पुणे । राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुक होणार असून अकलूज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे, अशी घोषणा देशातील पहिल्या तृतीयपंथी सरपंच ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली कांबळे यांनी रविवारी पुण्यात एका कार्यक्रमानंतर केली. गतवर्षी राज्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अकलूज येथील तरंगफळ गावच्या सरपंचपदी तृतीयपंथी ज्ञानेश्‍वर कांबळे यांची निवड झाली होती. वर्षभराच्या कालावधीत राज्यातील अनेक भागात त्यांना सन्मानित करण्यात आले.

बाबा ग्रुप ऑफ कंपनीस, एन 24 इंटरटेन्मेन्ट, ऑल सोर्स मीडिया यांच्या संकल्पनेतून बालगंधर्व कलादालनात रविवारी किन्नर सन्मान सोहळा संपन्न झाला. उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, अ‍ॅड. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या तर्फे किन्नरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या रंजिताबाई नायक (तृतीयपंथी प्रमुख गुरु), चांदणी गोरे (एनजीओ, निर्भया आनंदी जीवन), सोनाली दळवी (सोशल वर्कर), पन्ना गुरु (वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांच्या मुलांची शाळा चालवणे), माऊली कांबळे (सरपंच अकलूज), संचित पाटील (सोशल वर्कर), ऐश्‍वर्या बनसोडे (सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट), दिशा शेख (कवियत्री), रश्मी पुणेकर (पुणे महानगरपालिका कर्मचारी व आर्टिस्ट), प्रेरणा वाघेला (अध्यक्ष ह्युमन राईट्स व सोशल वर्कर) आदींना उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर बोलताना माऊली कांबळे म्हणाल्या, राजकारणात कायम सक्रिय राहणार असून आगामी विधानसभा निवडणूक अकलूज मतदार संघातून लढवणार आहे. या निवडणुकीत देखील विजयी होईल. तृतीयपंथी म्हणून समाजाची आमच्या सारख्या व्यक्तीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन आहे. हे लक्षात घेता समाजातील प्रत्येक व्यक्तीने आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रचंड बहुमताने निवडून आले
ज्ञानेश्‍वर कांबळे म्हणाल्या, माळशिरस तालुक्यातील तरंगफळ हे गाव तीन हजार लोकांचे गाव आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या घरी तृतीयपंथी म्हणून कार्यक्रमानिमित्त जात असल्याने त्यांच्या समस्या माहीत होत्या. त्यामुळे गावातील लोकांसाठी काही तरी करावे अशी इच्छा सुरुवातीपासून होती. त्याच दरम्यान गतवर्षी निवडणुका समोर आल्या. या निवडणुकीत सुरुवातीला अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढे भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार केला. या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आणि मी प्रचंड बहुमताने निवडून आले.