…आता आम्हाला देतात शेतीविषयक शिकवण

0

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांची टीका : मावळ तालुका भाजप कार्यकारणी बैठक

लोणावळा । ज्यांच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांच्या सर्वांत जास्त आत्महत्या झाल्या ते आता आम्हाला शेतीविषयक शिकवण देत आहेत अशी टीका करत, स्वामिनाथन आयोगाचा ढोल बडवणार्‍यांनी 2006मध्ये या शिफारसी आल्यावर 2014 सालापर्यंत काय केले असा प्रश्‍न उपस्थित करीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि विधिमंडळ पक्षप्रदोत अतुल भातखळकर यांनी आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीमधील घोटाळ्यांची उदाहरणे देत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समाचार घेतला.

मावळचे आमदार जिल्हाप्रमुख बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळ्यात पार पडलेल्या भाजप मावळ तालुका कार्यकारणी बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भातखळकर बोलत होते.

त्यामुळेच भाजपला भरघोस पाठिंबा
जनतेप्रती सर्वाधिक संवेदनशील असणार्‍या भाजप सरकारने विश्‍वास आणि विकासाचे नाते जनतेसोबत निर्माण केले आहे. आणि त्यामुळेच देशभरातून जनतेचा भरघोस पाठिंबा भाजपला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार भेगडे यांनी सध्याच्या राजकारणात पक्षनिष्ठा दुरापास्त झाली असतानाही मावळातील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा जोपासली असल्याचे सांगितले. राजकारणाचे बाजारीकरण होऊ नये, व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ असून कार्यकर्ता हा सर्वोच्च केंद्रबिंदू आहे हे लक्षात ठेवा, अशी सूचना कार्यकर्त्यांना केली. तालुक्यात सध्या वातावरण दूषित करण्याचे काम सुरू असून तालुक्याच्या विकासासाठी मागील आठ महिन्यात 400 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे आमदार भेगडे यांनी यावेळी सांगितले.

आजी-माजी पदाधिकारी उपस्थित
या बैठकीला लोणावळा मंडल, तळेगाव मंडल, देहूरोड मंडल आणि वडगाव मावळ मंडल येथील पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात प्रामुख्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी आमदार दिगंबर भेगडे, भास्करराव म्हाळस्कर, गुलाबराव म्हाळस्कर, शांताराम कदम, सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, चित्राताई जगनाडे, सुनील शेळके, विशाल खंडेलवाल, प्रशांत ढोरे, जितेंद्र बोत्रे, सर्व मंडळ अध्यक्ष, सर्व नगरसेवक, कॅन्टोमेंन्ट सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक धर्मेंद्र शेट्टी यांनी केले तर आभार बाळासाहेब घोटकुले यांनी मानले.

कार्यकर्त्यांच्या भावना रास्त
सलग पाच वेळी आमदार निवडून दिल्याने तालुक्याला मंत्रिपद मिळावे ही तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना रास्त आहे. कदाचित आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत नंबर लागेलही पण मंत्रिपद मिळो अथवा न मिळो, भाजपसारख्या पक्षाचा कार्यकर्ता असणे हे माझ्यासाठी सर्वोच्च पद असल्याचे भेगडे यांनी बैठकीत सांगितले.