मुंबई (निलेश झालटे):– डिजिटल कार्यप्रणालीवर भर देणारे सरकार शैक्षणिक प्रणालींमध्ये ऑनलाईनबाबत नवनवी धोरणे आखत असताना दिसून येत आहे. आता व्यावसायिक शिक्षणामधील अत्यंत महत्वाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आयटीआय)च्या अंतिम परीक्षा चालू वर्षीपासून किंवा पुढच्या वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने घेतले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री राजीव प्रताप रूडी यांच्या विभागाकडून लवकरच याबाबत निर्णय होणार असून तो राज्यातील आयटीआय संस्थांमध्येही लागू होण्याची चिन्हे आहेत. यामुळे व्यावसायिक शिक्षणाला आता नवे स्वरूप आणि गती येण्याची देखील चिन्हे आहेत.
100 हुन अधिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा:-
राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या कौशल्य विकास विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयद्वारे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील कामांचे प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्र राज्यात ४१७ शासकीय आयटीआय संस्था असून तीनशेहून अधिक खासगी आयटीआय संस्था आहेत. या संस्थांमध्ये सुमारे १०० हून अधिक प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. राज्यातील या सर्व संस्थांमधून दरवर्षी सुमारे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. राज्यातील औद्योगिकतेच्या वाढीच्या दृष्टीने व तरुणांना कौशल्याधारित रोजगार मिळण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम अत्यंत महत्वाचा आहे.
केंद्रिय मंत्र्यांनी सूचना दिल्याची माहिती:-
अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या थिअरी व प्रॅक्टिकल अशी अंतिम परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा आतापर्यंत लेखी घेतली जात होती. आता नव्या संभाव्य धोरणानुसार आयटीआयच्या अंतिम परीक्षेपैकी ‘थिअरी’ परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी राज्यांच्या मंत्र्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असून लवकरच राज्यांमध्ये याबाबत अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती पाटील-निलंगेकर यांच्या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
गतिमानता येण्यासाठी महत्वाचा निर्णय:-
याबाबत अधिक माहितीसाठी मंत्री पाटील-निलंगेकर यांच्याशी संपर्क केला असता ते जीएसटीच्या कार्यक्रमासाठी राजधानी नवी दिल्लीत गेले असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकणार आहे. आजर्यंत परीक्षा झाल्यानंतर त्याचा अंतिम निकाल येऊन त्यानंतर आयटीआय केलेल्या विद्यार्थ्याला नोकरी मिळण्यात बराच विलंब होत होता. आता ही परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन झाल्यास निकाल लवकर लागून उत्तीर्ण विद्यार्थ्याला विविध औद्योगिक संस्थांमध्ये नोकरी मिळून त्याला रोजगार मिळणे अधिक गतिमान होऊ शकणार आहे.