आता आयपीएल दिसणार स्टारवर

0

मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सोमवारी मोठी लॉटरी लागली आहे. मंडळाचे लाडके अपत्य असलेल्या बहुचर्चित इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेला आपल्याकडे खेचण्यासाठी 24 कपंन्यामध्ये चढाओढ लागली होती. आयपीएलच्या टिव्ही आणि डिजीटल प्रसारण हक्कांसाठी झालेल्या लिलावात स्टार इंडिया आणि सोनीने चढ्या किमतीच्या बोली लावल्या. सुमारे चार तासांच्या चढाओढीनंतर स्टार इंडियाने 16, 347 कोटी रुपयांमध्ये आयपीएलच्या दोन्ही, डिजिटल आणि टिव्ही प्रसारणाचे हक्क विकत घेतले. आता पुढील पाच वर्षांसाठी 2018 ते 2022 पर्यंत आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार स्टार इंडियाकडे असतील. स्पर्धेच्या वाटचालीत दुसर्‍यांदा आयपीएलच्या प्रसारणाच्या हक्कांसाठी लिलाव पुकारण्यात आला. पहिल्यांदा 2008 मध्ये सोनीने भारतीय उपखंडातील हक्क 8200 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. स्टारकडे याआधीच भारतीय क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. आता आयपीएलच्या हक्कांमुळे भारतीय क्रिकेटवर एकप्रकारे स्टारचाच अधिकार निर्माण झाला आहे.

1 आयपीएलला आपल्याकडे खेचण्यासाठी जिओ रिलायंस, इएसपीएन, स्काय सारख्या बड्या कंपन्या शर्यतीत होत्या. आयपीएलमधील प्रत्येक सामन्यासाठी स्टार 55 कोटी रुपये खर्च करणार.
2 टीव्ही प्रसारणांच्या हक्कासाठी सोनीने लावली होती 11,050 कोटी रुपयांची बोली. स्टारने डिजीटल आणि टिव्हीसाठी 16,347 कोटी रुपयांची एकत्रीत बोली लावून मारली बाजी.
3 10 वर्षांच्या कालावधीनंतरही कमी किमतीची बोली प्रसारण हक्कांसाठी लागली. त्याहून जास्त किंमत मिळायला पाहिजे होती असे मत लीगचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी व्यक्त केले.

कमी किंमत मिळाली
स्टार इंडियाने सुमारे 16,347 कोटी रुपये मोजून प्रसारणाचे हक्क मिळवले. पण आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्या मते प्रसारणाच्या हक्कांना खूपच कमी किंमत मिळाली आहे. मागील 10 वर्षाच्या वाटचालीत स्पर्धेला मिळालेली लोकप्रियता पाहता स्टारने लावलेल्या बोलीपेक्शा अधिक किंमत मिळायला पाहिजे होती, असे ट्टिव ललित मोदी यांनी केले आहे.

एकत्रित बोलीचा स्टारला फायदा
लिलावादरम्यान स्टारने भारतीय उपखंडातील प्रसारणांच्या हक्कांसाठी 6196.94 कोटी रुपयांची बोली लावली होती. दुसर्‍या बाजूला या हक्कांसाठी सोनीने 11,050 कोटी रुपयांची बोली लावली होती. याचा अपवाद वगळता सोनीने अन्य दुसर्‍या कुठल्या हक्कांसाठी बोली लावळी नव्हती. स्टारने मात्र या हक्कांसह जागतिक हक्क आणि डिजीटल हक्कांसाठी एकत्रित अशी 16,347 कोटी रुपयांची बोली लावली होती. शेवटी सगळे अधिकार स्टार इंडियाला मिळाले. मागील वेळीस सोनीने टिव्ही प्रसारणांच्या हक्कासाठी 10 वर्षांसाठी 8200 कोटी रुपये आणि जागतिक डिजीटल हक्क नोवी डिजीटलला 2015 मध्ये 302.2 कोटी रुपयांना देण्यात आले होते.