मुंबई – शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढल्यानंतर आता विरोधकांनी त्यांचा मोर्चा मुंबईतील इंदू मिलवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या प्रलंबित प्रश्नाकडेे वळवला आहे. यासाठी प्रत्यक्ष इंदू मिल येथे जाऊन विरोधकांनी सरकारच्या इंदू मिल प्रश्नावरील वेळकाढूपणाच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधक आक्रमक झाले.
लवकरात लवकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरु व्हावे, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते इंदू मिलजवळ एकत्र आले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. तीन वर्षात स्मारकाचे काहीच काम न करणार्या सरकारचा धिक्कार असो. माफी मागा, माफी मागा, महाराष्ट्राची माफी मागा, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची जयंतीही जवळ आली आहे. तरीही स्मारकाच्या कामाला अजून सुरुवात झालेली नाही. राज्य सरकार स्मारकाच्या कामाबाबत वेळकाढूपणा करत आहे, दुर्लक्ष करत आहे. सरकारला गांभीर्यच नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.