आता उत्तर प्रदेशातील विद्यापीठांतही मराठीचे धडे

0

लखनऊ। महाराष्ट्रातील परप्रांतियांविरोधातील आंदोलनाची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेतली आहे. उत्तर प्रदेशातील लोकांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता यावी म्हणून उत्तर प्रदेशातील विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारने घेतला असून त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राशी सांस्कृतिक संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्यात येणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. लखनऊ येथे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेशातील विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे मराठी शिकवण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आल्याचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान, 2008 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतियांविरोधात आंदोलन पुकारले होते. त्यांनी उत्तर भारतीयांवर हल्लेही चढवले होते. मराठी माणसालाच नोकरीत प्राधान्य मिळायला हवे असे सांगतानाच महाराष्ट्रात राहणार्‍यांना मराठी यायलाच हवी, अशी मागणीही राज यांनी केली होती. यापार्श्‍वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.