आता उत्सुकता निकालाची

0

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचे ध्यान आकृष्ट करून घेणार्‍या गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. अनेक दावे-प्रतिदावे आणि एकमेकांवरील चिखलफेकीने गाजलेल्या या निवडणुकीचे निकाल हे देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरणार असून यामुळेच याबाबत प्रचंड उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

एखाद्या राज्यातील विधानसभा निवडणूक किती चुरशीची बनू शकते? आणि मतदारांना आकृष्ट करण्यासाठी नेते कोणच्या स्तराला जाऊ शकतात? याचे उदाहरण म्हणून गुजरात विधानसभेच्या विद्यमान निवडणुकीचे उदाहरण हे भविष्यात नेहमी दिले जाणार आहे. खरं तर 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा उधळलेला वारू आटोक्यात आणण्याचे प्रसंग नक्कीच आले आहेत. विशेषत: दिल्ली विधानसभेतील पक्षाच्या दारूण पराभवामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. यानंतर बिहारमधील अत्यंत चुरशीच्या लढतीत लालू, नितीश आणि काँग्रेसने एकत्रीतपणे भाजपला पाणी पाजले होते. अर्थात तेथे फुटीच्या राजकारणात नितीश आणि भाजपने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यामुळे हा पक्ष सत्तेत सहभागी झाला असला तरी विरोधक एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होऊ शकतो हे सिध्द झाले. तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, केरळ, पुद्दुचेरी आदींमध्ये भाजपला फारशी संधी नव्हतीच. अर्थात लोकसभा निवडणुकीनंतर देशात झालेल्या निवडणुकांमध्ये संबंधीत अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाने विविध राज्यांमध्ये दणदणीत विजय संपादन केला. यातील नोटाबंदीपश्‍चातच्या कालखंडात झालेल्या युपीतील निवडणुकीत भाजपला एकतर्फी विजय मिळवल्यामुळे या पक्षात आत्मविश्‍वासाचे वारे संचारले. जनतेने नोटाबंदीच्या निर्णयाला स्वीकारल्याचा गवगवा करण्यात आला. याचसोबत मोदी लाटदेखील कायम असल्याचा दावा करण्यात आला. तथापि, जुलै महिन्यापासून वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी अंमलात आल्यानंतर हलकल्लोळ उडाला.

मोदी सरकारची अलोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. विशेष करून या पक्षाची आजवरची हक्काची मतपेढी गणली जाणार्‍या व्यापारी आणि उद्योजक वर्गाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. यामुळे व्यापार व उद्योग उद्ध्वस्त होत पर्यायाने रोजगारावरही गदा आली. यामुळे जनतेतून उठणार्‍या तीव्र नाराजीला हेरून केंद्र सरकारने जीएसटीची प्रक्रिया सुलभ करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यात आकारणीच्या स्लॅबमधून महत्वाच्या सेवांना सवलती देण्यात आल्या. मात्र याचा दृश्य परिणाम समोर येण्याआधीच गुजरात निवडणुकीची धामधुम सुरू झाली. आणि अर्थातच याच जीएसटी हा महत्वाचा मुद्दा ठरला. काँग्रेसची धुरा सांभाळणारे राहूल गांधी यांनी तर सुरवातीपासून ते प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यातील शेवटच्या दिवसापर्यंत जीएसटी म्हणजेच ‘गब्बर सिंग टॅक्स’ असल्याची जोरदार टीका केली. तर भाजपने जीएसटीचा वापर व्यवहार्य ठरविला. तथापि, काही दिवसातच याच्याऐवजी प्रचाराला दुसरे वळण लावण्यात भाजप नेत्यांना यश आले. यामुळे विकासावरून सुरू झालेला प्रचार हा भावनात्मक पातळीवर पोहचला. गुजरातमधील जनतेच्या नाराजीला राहूल गांधी यांनी व्यवस्थितरित्या समजून घेत प्रचाराची रणनिती आखली. त्यांनी बिनदिक्कतपणे हिंदूत्वाचा आधारदेखील घेतला. भाजपने ते हिंदू आहे की नाही? यावरून संशयकल्लोळ सुरू केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आततायीपणा दाखवला तरी राहूल गांधी शांत राहिले. एवढेच नव्हे तर पंतप्रधान मोदींवर शेलकी टीका करणार्‍या मणिशंकर अय्यर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांनी सर्वांना चकीत केले. राहूलजींच्या जोडीला गुजरातमधील तीन भिन्न घटकांचे प्रतिनिधीत्व करणारे हार्दीक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या त्रिकुटाची त्यांना साथ मिळाली. हार्दीकच्या वैयक्तीक जीवनाबाबतच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या तरी त्याच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झाला नसल्याची बाब निवडणुकीच्या कालखंडात अधोरेखित झाली. याचप्रमाणे राहूल गांधी यांचे नेतृत्वदेखील परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे यातून दिसून आले. त्यांनी गुजराती जनतेशी संवाद साधण्यास प्रारंभ केला. याला चांगला प्रतिसादही लाभला. मात्र यावर मात करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच अपेक्षेप्रमाणे मैदानात उतरवले. आणि अर्थातच त्यांनी या निवडणुकीला विकासाऐवजी गुजरातच्या अस्मितेला जोडण्याचे कौशल्य दाखविले. यामुळे गुजरातच्या निकालात आता पुन्हा एकदा भावना जिंकणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. गुजरात निवडणुकीत अनेक महत्वाचे मुद्दे जगासमोर आले. एक तर काँग्रेसने पाटीदार आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

यासोबत शेतकर्‍यांना कर्जमाफी प्रदान करण्यात येणार असल्याचेही राहूल गांधी यांनी जाहीर केले आहे. याला उत्तर देतांना भाजपने सातत्याने काँग्रेस पक्षाकडून सरदार पटेल यांच्यावर कसा अन्याय झालाय? याचेच पालूपद लावले. पटेल यांच्या माध्यमातून काँग्रेसने गुजरातचा अपमान केल्याचाही मोदींनी दावा केला. तर दुसर्‍या टप्प्यात मणिशंकर अय्यर यांच्या बेताल बोलांमुळे त्यांना नवीन मुद्दा मिळाला. अय्यर यांनी आपल्याला, आपल्या जातीला आणि पर्यायाने गुजरातलाच ‘नीच’ म्हटल्याचा दावा त्यांनी केला. याच्याही पुढे जात मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या एका बैठकीवरून मोदींनी थेट पाकिस्तानचाच गुजरात निवडणुकीत ‘रस’ असल्याचा अचाट दावा करून खळबळ उडवून दिली. यावरून डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या मवाळ प्रवृत्तीच्या नेत्यालाही मौन सोडावे लागले. सुदैवाने हा मुद्दा फारसा तापला नाही. तथापि, पाकिस्तान, काँग्रेस आणि गुजरात असा संबंध जोडत संशयकल्लोळ निर्माण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यशस्वी झाले. मात्र एवढे करूनदेखील गुजरातमध्ये भाजपला विजयाची शाश्‍वती वाटत नसल्याचे नेत्यांच्या देहबोलीतून दिसून येत होते. बहुतांश ओपिनियन पोल्समध्येही भाजप आणि विरोधकांमध्ये चुरशीची टक्कर होणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले होते. मात्र मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपच्या गोटात उत्साहाचे वारे संचारले आहे. अर्थात विजयश्री कुणालाही मिळणारी असली तरी गुजरात निवडणुकीचा निकाल हा देशाच्या राजकारणावर व्यापक परिणाम करणार असल्याचे बहुतांश राजकीय निरिक्षकांचे मत आहे. आणि यात तथ्यदेखील आहे.