आता एअर इंडिया विकाच

0

नवी दिल्ली। नियोजन आणि विकासात महत्त्वाची भूमिका असलेल्या नीती आयोगाने केंद्र सरकारला एअर इंडियामध्ये निर्गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. सध्या तोट्यात असलेल्या एअर इंडियामध्ये निर्गुंतवणूक केली, तर सरकारचा पैसा वाचेल आणि तोच पैसा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी वापरता येईल, असे नीती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

एअर इंडियावर 60 हजार कोटींचे कर्ज
नीती आयोगाने एअर इंडियासंबंधी चौथा अहवाल सरकारला दिला असून, त्यामध्ये निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेच्या रोडमॅप असू शकतो. एअर इंडियावर 60 हजार कोटींचे कर्ज असून, 21 हजार कोटींचे कर्ज विमानासंबंधी तर, 8 हजार कोटींचे भांडवली कर्ज आहे. एअर इंडियाच्या नव्या मालकाकडे ही दोन्ही कर्जे ट्रान्सफर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या अहवालामुळे केंद्र सरकारला निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करता येईल.

आतापर्यंत 40 हजार कोटींचा तोटा
एअर इंडियाला आतापर्यंत 40 हजार कोटींचा तोटा झाला असून, चालू आर्थिकवर्षात 3 हजार कोटी रुपयांच्या रोख रकमेची कमतरता भासणार आहे. 2015-16 वर्षात एअर इंडियाचे ऑपरेटिंग नफा 105 कोटी होता. पण नफ्याचा हा आकडा कायम राहणार नसल्याचा अंदाज आहे. मागच्या पाच वर्षांत एअर इंडिया चालवण्यासाठी सरकारने 25 हजार कोटी रुपये खर्च केले असून, पुढच्या काहीवर्षात इतकीच रक्कम खर्च करावी लागणार आहे. केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्री गजपती राजू आणि जयंत सिन्हा यांनी निती आयोगाकडून अहवाल प्राप्त झाल्याचे सांगितले. पण त्या काय आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती दिलेली नाही.

अरुण जेटलींचाही विक्रीला पाठिंबा
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीसुद्धा नुकसानीमध्ये चालणार्‍या एअर इंडियाच्या विक्रीला पाठिंबा दिला आहे. एअर इंडियासंबंधी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

सर्व पर्याय खुले
आम्हाला एअर इंडियाचा अभिमान असून सर्व पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. एअर इंडियाला व्यवहार्य बनवण्यासाठी नीती आयोगाने काही कठोर उपाय सुचवले आहेत.
गजपती राजू,
केंद्रीय हवाई उड्डयन मंत्री

एअर इंडिया मालमत्ता विकणार
एअर इंडियाच्या मुंबई, बंगळुरू आणि त्रिवेंद्रम येथील काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आणि फ्लॅटची विक्री करण्यात येईल असे समजते. सात मालमत्ता विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्यापोटी 80 कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे.